पुणे : तहानलेल्या माणसाला पाणी द्यावे, पुण्य लागते, असे आपल्याला सांगितले जाते. त्यामुळे ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलेने त्याला पाणी दिले. घरात त्या एकट्याच असल्याचे पाहून त्याचे आजींना जखमी करुन त्यांच्याकडील १ लाख रुपयांचे दागिने ओरबाडून चोरुन नेले. त्यात या आजी जखमी झाल्या. ही घटना नारायण पेठेत शनिवारी भर दिवसा सकाळी साडेअकरा वाजता घडली.याबाबत नारायण पेठेतील एका ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी, नारायण पेठेतील योगेश्वर अपार्टमेंटमध्ये या आजी राहतात. त्या दिवसभर एकट्याच असतात. शनिवारी सकाळी त्या बाहेर गेल्या होत्या. तेथून त्या सकाळी साडेअकरा वाजता परत आल्या. घराचे कुलूप उघडून त्यात आत आल्यावर त्यांच्या पाठोपाठ एक जण आत आला व त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले़ आजींनी त्यांना पाणी दिले. पाणी पिताना त्याने सर्वत्र पाहिले तर घरात कोणी नव्हते. आजू बाजूला कोणी दिसत नाही, हे पाहून त्याने आजींच्या हातातील सोन्याच्या ४ बांगड्या जबरदस्तीने काढून घेऊन लागला. आजींनी त्याला प्रतिकार करताच त्याने त्यांना ढकलून दिले. त्या खाली पडल्यावर जबरदस्तीने त्यांच्या छातीवर गुडघा ठेवून हातातील चार बांगड्या, सोन्याची अंगठी असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज काढून नेला. आजींनी प्रतिकार केल्याने बांगड्या काढताना त्यांच्या हातातील काचेच्या बांगड्या फुटून त्यांचा हाताला जखमा झाल्या. आजींना लुबाडल्यानंतर चोरट्याने बाहेरुन दरवाजा कडी लावून तो पसार झाला. आजी एकट्याच घरात अडकून पडल्या होत्या. सुदैवाने थोड्या वेळाने त्यांची सुन घरी आली़ तिने बाहेरील कडी उघडून घरात प्रवेश केला़ तर आत आजी पडलेल्या दिसून आल्या. त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी सुरु केली आहे. चोरट्याने पांढरट, हिरवट रंगाचा पट्ट्याचा शर्ट घातला होता. डोक्यावर टोपी घातली होती. तो साधारण ४५ ते ५० वर्षाचा होता. ही सोसायटी रस्त्यापासून आत आहे. तेथे सीसीटीव्ही नाहीत. वयामुळे आजींना चोरट्याचे वर्णनही सांगता येत नाही.शहराच्या मध्य वस्तीत भर दिवसा जबरी चोरीची गेल्या दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
माणुसकी म्हणून दिले पाणी, त्यानेच लुबाडले ८० वर्षाच्या वृद्ध महिलेला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 2:57 PM
चार बांगड्या, सोन्याची अंगठी असा १ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला..
ठळक मुद्देनारायण पेठेत भर दिवसाची घटना