आळंदी : नद्यांना आपण मातृतुल्य संबोधता, परंतु त्यांचे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हा अमृताचा झरा खळाळत ठेवण्यासाठी इंद्रायणीसह अनेक नद्यांवर शहरांच्या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आळंदीत केली.ज्ञानेश्वरी लेखणीच्या ७२५व्या वर्षानिमित्त आळंदी येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता फडणवीस यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. वारकरी म्हणजे देशाची सज्जन शक्ती. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी त्यांनी तब्बल सव्वासातशे वर्षे जोपासली. त्यातील भक्तिभाव व आध्यात्मिक भावना जोपासली, हेच आमचे वैभव आहे. आज आम्ही वैश्विकीकरणाकडे जात आहोत, जग जवळ येत आहे. मात्र संत ज्ञानेश्वरांना हे तेव्हाच समजले होते. वैश्विकीकरणाचा पहिला संदेश त्यांनी जगाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने दिला, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माऊलींची प्रतिमा व ज्ञानेश्वरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. दि. २७ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान सुरू असलेल्या सोहळ्याची सांगता रामायणाचार्य रामराव ढोकमहाराज यांच्या कीर्तनाने व उपस्थित भाविकांना महाप्रसादवाटपाने करण्यात आली. या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रवक्ते माधव भंडारी यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, नेवाशाचे आमदार भानुदास मुरकुटे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, रमेश गोगावले, अ. भा. वारकरी मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार
By admin | Published: January 04, 2016 1:09 AM