कोरेगाव भीमा : दूषित पाण्यामुळे मेटाकुटीला आलेल्या नदीकाठच्या गावांत आता जलशुद्धीकरण यंत्रणेमुळे याच पाण्याचे रेशनिंग सुरू झाले आहे. ही केंद्र आता ग्रामपंचायतींच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन बनत आहेत. तर, काही ग्रामपंचायतींत मात्र या पाण्याच्या पैशांचा अपहार सुरू असल्याच्याही तक्रारी येत आहेत. २५ पैसे लिटर...पाच रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी ते आता थंड पाणीही ५० पैसे लिटरने ग्रामपंचायती ग्रामस्थांना विकत आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांचे दूषित पाणी व औद्योगिक कारखानदारीचे रसायनमिश्रित पाणी भीमा, भामा, इंद्रायणीसह मुळा, मुठा नद्यांमध्ये मिसळत असल्याने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात माजी आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर दोन्ही महानगरपालिकांनी पुणे जिल्हा परिषदेकडे सुमारे १३ कोटी निधी वर्ग करीत नदीकाठच्या १२१ गावांना शुद्ध पाणी प्रकल्प बसवून दिले. यामध्ये शिरूर तालुक्यातील १७ , हवेली तालुक्यातील ३७, दौंड तालुक्यातील २७, इंदापूर तालुक्यातील ३२ व खेड तालुक्यातील ८ गावांमध्ये शुद्ध पाणी प्रकल्प बसविण्यात आले. या शुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाल्याने नागरिकांचे पैसे तर वाचले. शिवाय ग्रामपंचायतींनी सुरुवातीस शुद्ध पाणी नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले. सध्या ग्रामपंचायती २५ पैसे लिटरप्रमाणे पाच रुपयांत २० लिटर शुद्ध पाण्याचे नागरिकांना वाटप करू लागले. या पाण्याच्या पैशातून ग्रामपंचायतींना त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम मिळू लागल्याने आर्थिक पाठबळ मिळाले. ग्रामपंचायतींनी काही ठिकाणी एटीएम मशिन, कॉईन बॉक्स, पावती तर काही रोख पैसे घेऊन पाणी देत आहेत. यातून मिळालेली रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा करून एकूण उत्पन्नाच्या जास्त रक्कम पाण्यापासून मिळत आहे. यातून छोट्या ग्रामपंचायतींना आर्थिक पाठबळ मिळत आहे. मात्र काही ग्रामपंचायतींच्या नावाखाली या पाण्यापासून कमाईचे साधन मिळाल्याने यात आर्थिक भ्रष्टाचारही वाढू लागला आहे.शुद्ध पाणी प्रकल्पामध्ये किती पाणी शुद्ध झाले व किती पाणी नागरिकांनी नेले, याचा ताळमेळ नसल्याने प्रकल्पातील उत्पन्नात भ्रष्टाचार होताना दिसून येत आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रकल्पामध्ये बेंडिंग मशिन बसवण्याचे आवाहन माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनी केले आहे. हे मशिन बसविल्याने शुद्ध पाणी प्रकल्पात किती तयार होते व किती लिटर पाणी नागरिकांनी नेले, हे रीडिंगप्रमाणे समजते. यामुळे या प्रकल्पातून होणारा भ्रष्टाचार कमी होण्यास मदत मिळणार आहे.पाण्यापासून सरासरी मासिक उत्पन्नवडगाव रासाई : ४० ते ५० हजार, सणसवाडी : ३० हजारांपेक्षा जास्त रक्कम, वढू बुद्रूक : २० हजार, आपटी : १० ते १२ हजार, दरेकरवाडी धानोरे : १५ हजार, टाकळी भीमा, रांजणगाव सांडस : २५ ते ३० हजार, विठ्ठलवाडी : १८ ते २० हजार, तळेगाव डमढेरे : १२ ते १५ हजार. वडगाव रासाईत अभिनव उपक्रम : थंड पाणी ५० पैसे लिटर एक ते दीड वर्षापूर्वी माजी आमदार अॅड. अशोक पवार यांच्या गावी वडगाव रासाईमध्ये शुद्ध पाणी प्रकल्प बसविला. अशोक पवारांनी स्वत: लक्ष घालून हा प्रकल्प सुरळीत चालू करून या प्रकल्पामध्ये बेंडिग मशिन बसवित नागरिकांना एटीएम व कॉईन बॉक्समधून पाणी उपलब्ध करून देत ग्रामपंचायतींच्या सहा ते सात लाख एकूण उत्पन्नापेक्षा जास्त या पाण्यापासून सात ते आठ लाख रुपये जमा तर होतातच. शिवाय या ग्रामपंचायतीने या वर्षी उन्हाळ्यात थंड पाण्याचेही मशिन बसवीत फक्त ५० पैशात एक लिटर शुद्ध थंड पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा राज्यात अभिनव उपक्रम राबविला आहे.
नदीकाठच्या गावांत पाण्याचे रेशनिंग
By admin | Published: June 01, 2016 12:55 AM