लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील धरणक्षेत्रात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. या चार धरणांमध्ये सुमारे ११.२२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत अद्यापही धरणातील पाणीसाठा कमीच आहे.सुमारे पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाच्या लहान-मोठ्या सरी पडत आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. वरसगाव धरण परिसरात रविवारी दिवसभरात सुमारे ५६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे या धरणाचा साठा आता ३.९५ टीएमसी झाला आहे. पानशेत धरण क्षेत्रात सुमारे ६३ मि.मी. पाऊस पडल्यामुळे पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. पानशेत धरणातील पाणीसाठा ५.९७ टीएमसीपर्यंत पोहचला आहे. मात्र, खडकवासला धरण क्षेत्रात इतर धरणांच्या तुलनेने कमी पाऊस पडतो. खडकवासामध्ये केवळ १७ मि.मी. पाऊस पडला असून धरणसाठा ०.७२ टीएमसीपर्यंत गेला असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. या धरणात दिवसभरात सुमारे १०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पवना धरणसाठा ५.०१ टीएमसी वर गेला आहे.
जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा ११.२२ टीएमसी
By admin | Published: July 17, 2017 4:30 AM