- लोकमत न्यूज नेटवर्क
डेहणे : भीमाशंकर अभयारण्यातील व खेड वन विभागाच्या वन परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडले आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करीत आहे. पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची जबाबदारी असलेले वन विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भीमाशंकर अभयारण्य तसेच खेड वन परिक्षेत्रातील वांद्रे, खरपूड, भोमाळे या गावांच्या वनहद्दीतील पाणवठे आटल्याने जंगलात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. वन विभागाने बोटांवर मोजता येतील इतके कृत्रिम पानवठे तयार केले आहेत. मात्र, भीमाशंकर वन परिक्षेत्रातील जनावरांची संख्या पाहता, पाणवठे कमी असून त्यातही पाणी नसल्याने जंगलात पाणीटंचाईचे सावट आहे. दर वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला तरी या वर्षी उन्हाच्या दाहकतेमुळे जलस्रोत आटले आहेत. परिणामी, पक्षी व प्राण्यांची भिस्त पाणवठ्यांवर आहे. मात्र, पाणवठेही कोरडे पडले आहेत. पाण्याच्या शोधात माकडे, तरस, रानडुकरे, ससे, मोर व इतर पशुपक्षी मनुष्य वस्तीकडे धावू लागले आहेत.वन विभागाने पाणवठ्यातील जलस्रोत वाढवून तहानलेल्या वन्यजीवांचे जीव वाचवावे. शासन वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता व नियोजनासाठी इतर विभागांपेक्षा वन विभागावर करोडो रुपये खर्च करीत असते. वन्यजीवांना जंगलात मुबलक पाण्याची सोय करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना होते. याही वर्षी ती करण्यात आली; परंतु अभयारण्यातील एक थेंबही नसलेल्या पाणवठ्यांची संख्या पाहाता, वन्यप्रेमींमध्ये या वर्षी झालेल्या प्राणीगणनेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तर, अधिकारी याबाबत माहिती देताना टाळाटाळ करीत आहेत.एकूणच आटलेल्या पाणवठ्यांमधील गाळ काढून नैसर्गिक जलस्रोत पुनर्जीवित करणे किंवा कृत्रिमरीत्या पाणवठे पाण्याने भरणे अपेक्षित आहे. यासाठी मात्र वनाधिकाऱ्याची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.