तळेघर: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या पाण्याच्या जलस्रोतांनी व पाण्याच्या साठ्यांनी यावर्षी मार्च महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागातील आदिवासींना लवकरच मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे या खोरे हा परिसर मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजले जाते.पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला जातो. परंतु उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. गेले कित्येक वर्षानुवर्ष या भागातील लोकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या भागामध्ये असणाऱ्या विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे, तळी, शेततळी हे मुख्य असणारे जलस्रोत या भागामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये तुडुंब भरतात. परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही. कूपनलिकांचीही तशीच अवस्था आहे.
उन्हाळ्यामध्ये या भागात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्यासाठी या भागातील आदिवासी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. श्रीक्षेत्र भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण (आंबेगाव) येथील पाझर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून बाराज्योर्तिलिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसरातील गावांना लवकरच पाणी टंचाईशी सामना करावा लागणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जसजसा उन्हाळा जाणवू लागला आहे. तस तशा उन्हाळ्याच्या झळा या भागामध्ये सोसाव्या लागत आहेत.
१४ तळेघर