लोकमत न्यूज नेटवर्क
उंडवडी कडेपठार : सध्या उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील उंडवडी कडेपठार, जराडवाडी, बऱ्हाणपूर, गोजुबावी, खराडेवाडी, कारखेल, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे गावांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. परिसरातील ओढे-नाले आटले
आहेत. विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या भागात गतवर्षी वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र
डिसेंबरनंतर पाणीउपसा वाढल्यामुळे हळूहळू विहिरी खोल जाण्यास सुरुवात
झाली. तर आता ज्या भागात भूजलपातळी वाढली होती, त्या भागातही पाण्याची
टंचाई जाणवू लागली आहे. डिसेंबरपर्यंत ओढा-नाले, छोटे मोठे तलाव तसेच
विहिरी भरून होत्या. परिणामी रब्बी हंगामात बागायती क्षेत्रात वाढ होऊन
पीकरचना बदलली. त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने विहिरींनी आता तळ गाठला
आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिकांसमोर अडचणी वाढल्या आहेत, तर जनावरांच्या
पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. पाण्याची कमतरता असल्याने उंडवडी
कडेपठार ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून कधी दोन दिवसांआड, तर कधी
चार दिवसांआड नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. जिरायती भागाला वरदान
ठरलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजनेतून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने
परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शिरसाई कालव्याला मध्यंतरी पाणी
सुटले असले तरी काही भागांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. सध्या
पंचायत समितीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने टँकरची मागणी करता येत
नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिरसाई उपसा
योजनेतून तलावात पाणी सोडावे,अशी मागणी उंडवडी कडेपठारचे सरपंच भरत
बनकर,उपसरपंच भूषण जराड यांनी केली आहे.
फोटो ओळ: १) उंडवडी कडेपठार येथील कोरडा पडलेला तलाव.