दौंड : येथील उपजिल्हा रूग्णालयाला पाणीटंचाई भासू लागली आहे. याचा त्रास रुग्णालयातील कोरोनाबाधितांसह सामान्य रुग्णांनाही सहन करावा लागत आहे. पाणीच नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयाला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, तोही अपुरा आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयास टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, टँकरचा पुरवठा रोज होत नसल्याने अनेकदा रुग्णालयात पाणीच नसते. यामुळे डॉक्टर, नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत रुग्णांची पाणी नसल्याने गैरसोय होत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रस्त्याच्या खोदाई कामात फुटल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नादुरूस्त आहे. तिची अद्यापही दुरूस्ती झालेली नाही. मात्र, या प्रकाराकडे दौंड नगर परिषदेनेही दुर्लक्ष केले असल्याने गेल्या दीड वर्षापासून रुग्णालयाला टँकरने पाणी पुरवठा केल्या जात आहे. रुग्ण आणि वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयाच्या परिसरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी रुग्ण आणि आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.
चौकट
टँकरचा पाणी पुरवठा अपूर्ण
उपजिल्हा रुग्णालय नगर परिषदेची पाणीपट्टी नियमनाने भरते. असे असतानाही पाणी टँकरने घ्यावे लागते ही शोकांतिका आहे. वास्तविक पाहता रुग्ण आणि कर्मचारी यांच्या हितासाठी नळाने शुध्द पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. ते होत नसल्याने रोज टँकरने पाणी पुरवठा होतो. रुग्णालयाला दररोज पाच टँकर पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, दोन किंव्हा तीन टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये देखील सातत्य नाही. या बाबत नगर परिषदेला वारंवार पत्रव्यवहार करुन आम्ही थकलो आहे. मात्र, रुग्णालयाच्या परिसरात जलवाहिनी कार्यरत केली जात नाही. मात्र, पाणीपट्टी सक्तीने वसूल केली जाते.
- डॉ. संग्राम डांगे, वैद्यकीय अधीक्षक
---
दररोज तीन टँकर दिले जातात
ग्रामीण रुग्णालयास नित्य नियमाने दररोज दोन ते तीन टँकरने पाणी पुरवठा केला जातो. रस्त्याच्या खोदकामात जलवाहिनी नादुरुस्त आहे. लवकरच जलवाहीनीचे काम हाती घेतले जाईल. यामुळे रुग्णालयाच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल.
- दत्तात्रय क्षीरसागर, पाणी पुरवठा अधिकारी
---------
रुग्णांसाठी पाणी विकत आणावे लागते
सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयात १६ पुरुष आणि आठ महिला असे एकूण २४ कोरोनाच्या रुग्णसह इतर आजाराचे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. वैद्यकीय तत्वानुसार रुग्णांना टँकरचे पाणी पिण्यास अयोग्य असते. यामुळे रुग्णांच्या आरोग्यासाठी फिल्टर केलेल्या पाण्याचे जार रुग्णालय प्रशासनाला विकत आणावे लागत आहे.
फोटो : उपजिल्हा रुग्णालय