पुणे: खांद्यावर पताका, हातात चिपळ्या, टाळ, वीणा, डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी, टाळ-मृदंगाच्या तालावर नर्तन करीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष करणारे वैष्णव, डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने अवघी पुण्यनगरी दुमदुमली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात उत्साहात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी आजिनाथ किसन अभंग (वय ६०) यांनी भावना व्यक्त करत पाण्याची लय टंचाई असून पुढं कसं होणार असा सवाल उपस्थित केला आहे.
अभंग म्हणाले, यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय. यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं. पहाटे २ वाजता उठून बसलो व्हतो. ३ वाजता पाणी येणार म्हणून. लय अडचण होतीय बाबा. कसं होणार पुढं काय माहीत?’ पावसाने यंदा ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
वारीतदेखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याविषयी वारकऱ्यांची गप्पा मारल्या. तेव्हा यंदा जरा अवघडच परिस्थिती निर्माण होईल, अशाच प्रतिक्रिया सर्वांनी दिल्या. गेल्या तेरा वर्षांपासून आजिनाथ अभंग वारी करत आहेत. ते इंदापूर तालुक्यातील झगडेवाडीतील. ते वारीत गंध लावण्याचे काम करतात. त्यांना ५ एकर शेती आहे. त्यांच्याकडे १३ जर्सी गायी आहेत. त्यावरच त्यांचे घर चालते. ते म्हणाले, ‘मी माझ्या मंडळीसोबत (पत्नी) वारीला यायचो; पण आता मंडळींचे पाय खूप दुखत आहेत. त्यामुळे तिला यायला जमत नाही.’