पुणे: जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या असून, आंबेगाव, भोर, जुन्नर आणि खेड या चार तालुक्यांतील २४ गावांमधील १०५ वाड्या-वस्त्यांना २० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरमुळे या २४ गावांतील सुमारे ४० हजार नागरिकांची तहान भागविली जात आहे.
मागील वर्षी मान्सूनचे वेळेवर झालेले आगमन, दमदार पाऊस यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरली. तसेच परतीचा पाऊसही समाधानकारक झाला. त्यामुळे काहीशा उशिराने यंदा जिल्ह्यात टॅंकर सुरू करावे लागले. आता मात्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यातच यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. मे महिनाअखेर आणि जूनच्या पहिला आठवड्यात टॅंकरच्या संख्येमध्ये आणि पाणीटंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
आंबेगाव तालुक्यातील ८ गावांमधील ३५ वाड्या-वस्त्यांना ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भोरमधील एका गावात एक टॅंकर सुरू आहे. जुन्नरमधील ८ गावांमधील ३२ वाड्या-वस्त्यांना ६ टॅंकरने, तर खेडमधील ७ गावांमधील ३८ वाड्या-वस्त्यांना पाच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाने १९ विहिरी अधिग्रहित केल्या असून, त्याद्वारेसुद्धा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या २४ गावांमधील ३९ हजार ६०७ नागरिकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे.