उन्हाळा सुरु झाला की येथील ग्रामस्थांना सातत्यानेच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.शेरेवाडी,भोईरवाडी यांच्यापासुन दोन किलो मीटर अंतरावर दरा या ठिकाणी सार्वजनीक पिण्याच्या पाण्याचा पाणवठा आहे. या पाणवठ्यालगत टाटा कंपणीच्या सहकार्याने ग्रामपंचायतीमार्फत एका तळयाचे बांधकाम झाले आहे.या पाणवठयाच्या ७० ते ८० मीटर अंतरावर एका शेतक-याने विहिर खोदल्याने सार्वजनिक पाणवठ्याच्या पाण्याचा स्रोत आटला आहे.यामुळे ३०० लोकवस्ती असलेल्या या वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
विहिर खोदलेल्या शेतकरी यांना सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासुन ५०० मीटर परिघाच्या अंतरात विहिर खोदण्यास दिवाणी न्यायालय(वरिष्ठ स्तर )राजगुरुनगर यांनी मनाई केली असतानाही ते खोदलेल्या विहिरीतून पाणी उपसा खाजगी कारणास्तव करत असल्याने सार्वजनिक पाणवठ्याच्या पाण्याचा स्रोत खंडीत झाला आहे.यामुळे सार्वजनिक पाणवठयाच्या लगत तळ्यावर बांधकाम अपूर्ण अवस्थेत असलेली आदिवासी विभागाची ७.५० लक्ष रकमेची सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजनांवरील शासनाचा पैसा वाया जाणार आहे.या बाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करुनही ना ग्रामपंचायत लक्ष देत आहे ना तालुका स्तरिय प्रशासकीय यंत्रणा. पिण्याच्या पाण्यासाठी हवालदिल झालेले आदिवासी बांधव आता पंचायत समितीमार्फत पिण्याच्या पाण्याचा टँकर चालु करावा अशी मागणी करत आहेत.
--
चौकट
खेडच्या पश्चिम व भागातील काही गावामध्ये पाणीटंचाई सुरू झाली आहे. याबाबत आम्ही पाहणी केली. पाणीटंचाईबाबत ग्रामस्थांना काही उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लवकरच पाण्याचे टॅकर सुरू करणार आहे.
- राजेश कानसकर (नायब तहसिलदार खेड )
--
फोटो क्रमांक : ११वाडा पाणीटंचाई
फोटो ओळ: खरोशी येथे मिळेल त्या ठिकाणचे पाणी पातेल्याने भरुन घेत असलेल्या महिला