राजगुरूनगर : राजगुरूनगर नगरपरिषदेचा वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय अर्थसंकल्पाला प्रशासकीय सभेत मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नसून २३ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प असून नगरपरिषदेची आर्थिक बाजू सक्षम राहण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात करवसुलीला प्राधान्य देण्यात आले आहे. पाणीयोजना, शहरातील भुयारी गटार योजना व शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते मजबुतीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती राजगुरूनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी दिली.
राजगुरूनगरला नव्याने नगरपरिषद स्थापन झाल्यानंतरचा हा ११ वा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. मागील वर्षी (वर्ष २०२४-२५) ला १९ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावेळी मात्र मर्यादित उत्पन्न व खर्च यात समन्वय साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. नको असलेल्या खर्चाला काटछाट देण्यात आली आहे. महिला व बालकल्याण दुर्बल घटकातील नागरिक तसेच दिव्यांग नागरिक याकरिता प्रत्येकी ५ टक्के तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
राजगुरूनगर नगरपरिषदेच्या यावर्षीचा अर्थसंकल्पातील महत्वाच्या काही तरतुदी पुढीलप्रमाणे -
नमामि चंद्रभागा अभियानाअंतर्गत भीमानदी स्वच्छता व संवर्धन - २ कोटी रुपये.कचरा उचलणे व प्रक्रिया - १ कोटी रुपये.नळ कनेक्शन मीटर - १० लाख रुपये.रस्ते बांधकाम - १० कोटी रुपये.पाणीपुरवठा - १ कोटी रुपये.शहराअंतर्गत हायमास्ट बसविणे - ५० लाख रुपये.न.पा. इमारत फर्निचर - ७० लाख रुपये.दिवे आणि विद्युत खांब - ५५ लाख रुपये.पाणीपट्टी व वीज - १ कोटी ५० लाख रुपयेअधिसूचित विशिष्ट नागरी सुविधा पुरवणे - ५ कोटी रुपये.
राजगुरूनगर नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पातील उत्पन्नाच्या प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे-
संकलित कर - (५.५० कोटी रुपये), पाणीपट्टी (२.६४ कोटी रुपये), बांधकाम विकास शुल्क - (२.५० कोटी रुपये), नगरपालिका सहायक अनुदान (१.१८ कोटी रुपये).
अर्थसंकल्पीय दृष्टिकोन : महसूल जमा - (१७.६४ कोटी रुपये), भांडवली जमा - (५३.४९ कोटी रुपये), एकूण अपेक्षित जमा- (७१.१३ कोटी रुपये), महसुली खर्च - (१६.३१ कोटी रुपये), भांडवली खर्च - (५४.५९ कोटी रुपये), आरंभीची शिल्लक - (२३ लाख रुपये),
यावर्षीचा रिॲलिस्टिक असा अर्थसंकल्प आहे. मर्यादित उत्पन्न व खर्च साधण्याचा प्रयत्न केला आहे. नको असलेल्या खर्चाला काटछाट देण्यात आली आहे. यावर्षीचे शिलकीचा अर्थसंकल्प आहे. खर्चात कपात केली आहे. कोणतीही करवाढ केली नाही. शहराच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत. - अजिंक्य रणदिवे (मुख्याधिकारी राजगुरूनगर नगरपरिषद)