मोरगाव : पुरंदर तालुक्यातील नाझरे येथील मार्तंड जलाशयावर अवलंबून असलेल्या चार पाणी योजना व ४३ गावांना पाण्यासाठी दाहीदिशा करावे लागणार आहे. धरणात केवळ १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नाझरे येथील धरणावर मोरगाव प्रादेशिकवर १७ गावे, माळशिरस-पारगाव नळ योजनेवर २२ गावे, तर नाझरे प्रादेशिक नळ पाणी योजनेवर ४ गावे अवलंबून आहेत. सध्या पावसाळा सुरू असूनदेखील धरणाने तळ गाठला आहे. उपलब्ध असलेल्या मृत पाणीसाठ्यातून या योजना चालविल्या जात आहेत. मात्र, केवळ जेमतेम १५ आॅगस्टपर्यंतच पाणी पुरविले जाणार आहे, असे शाखा अभियंता विजय बुरसे यांनी सांगितले. याबाबतचे पत्र जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच यांना दिले आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात या गावांना टँकर सुरू करावा लागणार आहे. यासाठी या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी पावसासाठी प्रार्थना करीत आहेत. (वार्ताहर)बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील ६४ गावे दुष्काळी आहेत. शेतीला पाणी नाही. त्यातच मोरगाव प्रादेशिक योजनाही धोक्यात आल्याने या भागातील पाणीप्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे भापकर यांनी सांगितले.
बारामतीच्या ४३ गावांतील पाणीटंचाई तीव्र
By admin | Published: July 29, 2016 3:49 AM