पाईट : तालुक्याच्या पश्चिम भागातील विराम, भलवडी येथील गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाण्याची कायमस्वरूपी योजना नसल्याने रात्रभर जागून त्यांना येथील स्मशानभूमीतूनपाणी आणण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या अतिदुर्गम डोंगराळ पश्चिम भगातील विराम, भलवडी व तांबडेवाडी या संयुक्त ग्रामपंचायतीच्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाण्याची कुठली योजना नाही. यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पावसाची तीव्रता जास्त असल्याने नागरिकांना बाहेर पडणे कठीण होते. यामुळे स्मशानभूमीतील हातपंपावरून पाणी आणावे लागते.येथील पाणीटंचाईस काही अंशी निसर्गाचा तर काही अंशी तालुक्यातील पदाधिकारी जबाबदार आहेत. उन्हाळ्यात या गावांची टँकरची मागणी असूनही त्यांना टँकर मिळाला नाही. या परिसरातील नागरिकांची पाण्याची होणारी परवड लक्षात घेता विराम गावच्या उत्तरेला २०१३ ला ४६ लाख रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला; परंतु या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाले. पावसामुळे हा बंधारा वाहून गेला. यामुळे येथील जवळपास १२ ते १३ विहिरी गाडल्या गेल्या. बंधाराही गेला आणि गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही गाडल्या गेल्या. यामुळे पााण्याची सोय तर सोडाच, पण गैरसोय मात्र झाली. यावर गेल्या दोन वर्षांत कोणी काही बोलायला तयार नाही. हेही एक कारण टंचाईस आहे. दुसरे कारण गावापासून २ किमी अंतरावर विहीर आहे. त्या ठिकाणाहून विराम आणि गावास १२ लाख २० हजारांची व भलवडी गावास ९ लाख ४० हजारांची नळ-पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. परंतु, ग्रामपंचायत ठेकेदार असलेली नळ-पाणीपुरवठा योजना जुने पाइप बसवून पूर्ण केली. लोकवर्गणी भरूनही निकृष्ट काम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विराम, भलवडी या परिसरामध्ये ३ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्याचे गेल्या २ वर्षांपूर्वी ढापे चोरीस गेले आहेत. यामुळे या बंधाऱ्यांमध्ये एक थेंबही पाणी गेल्या २ वर्षांपासून साठलेले नाही. येथील स्मशानभूमीमध्ये दीड महिन्यापूर्वी अंत्यविधीसाठी दोन्ही गावच्या मध्यावर असलेल्या स्मशानभूमीवर एक हातपंप घेतला आहे. तोच सध्या या दोन्ही गावची तहान भागवत आहे. मात्र, येथील महिला-पुरुषांना व लहान-लहान मुलांना रात्रभर जागून स्मशानभूमीवर पाणी भरावे लागत आहे.
पाईट परिसरात पाणीटंचाई
By admin | Published: June 20, 2016 1:03 AM