वडगावशेरीचा पाणीटंचाई प्रश्न मार्गी लागणार, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 10:36 AM2020-07-10T10:36:53+5:302020-07-10T10:37:35+5:30
गेल्या १० वर्षांपासून रखडलेले भामा आसखेड पाईपलाईनचे काम मार्गी लागणार
पुणे : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार असून त्यामुळे वडगाव शेरी मतदार संघातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.
भामा आसखेड प्रकल्पाची आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली, यावेळी ते बोलत होते.
या महत्वपूर्ण प्रकल्पांमधील जलशुद्धीकरण केंद्र(WTP), कुरुळी (BPT- ब्रेकिंग प्रेशर टँक) व भामा आसखेड धरणाच्या जॅकवेल पंप हाऊसची यावेळी पाहणी करण्यात आली. केळगाव येथील 1.1 किमी पाईपलाईनचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. या संदर्भात आमदार सुनील टिंगरे यांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देत, भामा आसखेड प्रकल्पाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची विनंती केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत भामा आसखेड धरणाच्या कालव्यासाठी आरक्षित केलेल्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावरील शेरे काढण्याचे आदेश खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सुनील टिंगरे, आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्याची तातडीने अंमलबजावणी करत केळगाव येथील 1.1 किलोमीटरचे रखडलेले काम त्वरित वेगाने सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या कामाची आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका व प्रकल्पाचे अधिकाऱ्यांसह पाहणी केली. भामा-आसखेड प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लागणार असून त्यामुळे वडगावशेरी मतदार संघातील प्रलंबित पाणीटंचाईचा महत्वपूर्ण प्रश्न सुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार असल्याची माहिती यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.