वालचंदनगर : नीरा नदी ही तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेली आहे. या नदीच्या पाण्यावर हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी अवलंबून आहेत. त्याचबरोबर शेकडो गावे, वाड्यावस्त्या या नीरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. परंतु, पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने नीरा नदीच्या पात्रातील पाण्याने दोन महिन्यांतच तळ गाठला. तिन्ही जिल्ह्यांतील नदीकाठच्या शेतकऱ्यांवर तीव्र पाणी संकट ओढवलेले आहे. नीरा नदीवर पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील नदीकाठची अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात नदी कोरडी पडलेली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आल्याने भयानक दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली होती. जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता. आज नीरा नदीच्या पात्रात एक थेंबही शिल्लक राहिला नसल्यामुळे गेल्यावर्षीचे दिवस येथील शेतकऱ्यांंना आठवण करून देत आहे. नदीच्या काठावरील असंख्य शेतकऱ्यांनी पाण्याच्या अपेक्षेने उन्हाळी पिके घेतलेली आहेत. परंतु, पाणीच शिल्लक नसल्याने पिके जागेवरच वाळून जात आहेत. जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसल्याने दुग्ध व्यवसायावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या नीरा नदीपात्रात पाणी सोडल्यास हजारो जनावरांच्या जीविताचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे म्हणून नदीच्या पात्रातच आंदोलन करण्यात आले होते. परंतु, संबंधित विभागाने याची दखल न घेतल्याने आज नदीकाठावरील शेतकऱ्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे.
नीरा कोरडी पडल्याने तीन जिल्ह्यांत पाणीटंचाई
By admin | Published: April 09, 2017 4:22 AM