पुणे : पाणी वाचविणे ही आजच्या काळातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. पाण्याचे स्रोत खराब होऊ नयेत याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी केले.पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृहात रोटरी क्लब ३१३१ यांनी आयोजित केलेल्या ‘जलोत्सव २०१७’मध्ये त्या बोलत होत्या. या वेळी रोटरी क्लब आॅफ पूना डाऊनटाऊनच्या अध्यक्ष पल्लवी साबळे, रोटरी क्लब आॅफ शनिवारवाड्याच्या अध्यक्ष मीना भोंडवे आणि जलोत्सवाचे संयोजक सतीश खाडे या वेळी उपस्थित होते. खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘‘पाण्याचा योग्य वापर व योग्य नियोजन केले नाही, तर पुढील पिढीवर त्याचे परिणाम होतील. आज आपल्यावर ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आहे. पाण्याविषयी जलसाक्षरता, जागरूकता वाढली पाहिजे. पुण्याला सुदैवाने मुबलक पाणी आहे; पण ४० टक्के लिकेजमुळे पाणी वाया जाते. लिकेज दुरुस्ती करणे, जुन्या पाईपलाईन बदलणे गरजेचे आहे.’’प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष देशपांडे, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व्ही. एम. रानडे यांनी मार्गदर्शन केले. अजय मोकाशी आणि सोनाली मोकाशी यांनी सादरीकरणातून गाड्या धुतलेले पाणी, हॉटेलमधील वापरलेले पाणी या पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर कसा केला जातो, याविषयी माहिती दिली. जीवित नदीचे मनीष घोरपडे, ग्रीन थंबचे कर्नल सुरेश पाटील तसेच खासदार चव्हाण यांचा शैलेश पालकर व अन्य रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. समीर शास्त्री यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
पाणी वाचवायला शिकले पाहिजे
By admin | Published: March 21, 2017 5:24 AM