पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमधील धरणांमधील पाणीसाठा १०.७२ टीएमसी झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणसाठयातील वाढ सुरूच असून धरणामधील हे पाणी पुणे शहरास पुढील सात ते आठ महिने पुरेल एवढे असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, आज दिवसभरात खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तसेच या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची वाढ सुरूच असल्याचेही सांगण्यात आले. जून महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यभरात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने या धरणसाखळीतील धरणांमध्येही चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे ३ टीएमसीपर्यंत खाली आलेला पाणीसाठा या पावसाने सात टीएमसी पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. मात्र, २० जुलैपासून पुन्हा पावसाने दमदार पुनरागमन केले असून या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. तर धरणांच्या परिसरात संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढ्या-नाल्यांमधून धरणात पाणी येते आहे. (प्रतिनिधी)शहरासाठी आठ महिन्यांचा साठा - शहराला दररोज सुमारे १२५० एलएलडी पाण्याची गरज आहे. त्यानुसार, पालिकेस दर महिन्यास जवळपास सव्वा टीएमसी पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे जर पावसाने पुन्हा ओढ दिल्यास आणि हे सर्व पाणी शहरासाठी राखीव ठेवल्यास हे पाणी महापालिकेस आठ महिने पुरेल एवढे आहे. तर या पाणीसाठयात आणखी वाढ होत आहे. पाच दिवसांत ७७५ मिमी पाऊस - या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २० ते २५ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीत तब्बल ७७५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यात सर्वाधिक २६१ मिलिमीटर टेमघर, २१७ मिमी पानशेत, २१८ मिमी वरसगाव, तर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे ४२ मिमी पाऊस झाला आहे. तर गेल्या चोवीस तासांत या चारही धरणांंमध्ये सुमारे १८० मिमी पावसाची नोंद झाली.
पुण्याला आठ महिने पुरेल इतका पाणीसाठा
By admin | Published: July 26, 2015 12:35 AM