पुणे : गेल्या चार महिन्यांपासून दिवसाआड पाण्यावर तहान भागविणाऱ्या पुणेकरांना आता दुप्पट पाणीपट्टी भरावी लागण्याची शक्यता आहे. महापालिकेकडून मिळकत करात सरसकट ९०० रुपयांप्रमाणे आकारली जाणारी पाणीपटटी सरसकट १८०० रुपये करण्याचा प्रस्ताव कर संकलन विभागाने तयार केला असून, तो महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. या दरवाढीमुळे महापालिका प्रशासनास दर वर्षी तब्बल सव्वाशें ते दीडशें कोटी रुपयांची जादा उत्पन्न मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान, महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे स्थायी समिती काय निर्णय घेणार यावर पुणेकरांची पाणीपटटी अवलंबून असणार आहे. गेल्या काही वर्षात ही पाणीपट्टी वाढविण्यात आली नसल्याने तसेच महापालिकेच्या हददीजवळील ग्रामपंचायतीच्या पालिकेच्या पाणीपटटीपेक्षा दिड ते दोन पट अधिक पाणीपटटी आकारत असल्याने ही दरवाढ योग्य असल्याचे समर्थन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)...तर मोजावे लागणार १८०० रुपये महापालिकेच्या हददी जवळील ग्रामपंचायतींना पालिकाच पाणी पुरवठा करते. या पाणी पुरवठयाच्या मोबदल्यात या ग्रामपंचायतींकडून आकरण्यात येणारी पाणीपटटी जवळपास दुप्पट आहे. काही ठिकाणी ती १५०० रूपयां पासून जवळपास २५०० रूपयांपर्यत आहे. मात्र, महापालिकेकडूनही तोच पाणी पुरवठा केला जात असला तरी, त्यासाठी आकारली जाणारी पाणीपटटी मात्र अवघी ९००रूपये आहे. त्यामुळे पालिकेनेही या ग्रामपंचायतींप्रमाणेच कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही ठिकाणी एकाच प्रकारची सेवा पुरविली जात असल्याने करही समान असावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दिवसाआड पाण्यासाठी दुप्पट आकारणी होणार का? शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये या वर्षी आॅक्टॉबर २०१५ अखेर ५० टक्क्याहून कमी पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पुणेकरांवर दिवसआड पाणी कपातीची वेळ ओढावली आहे. तर भविष्यात ही कपात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळयापर्यंत ही कपात लक्षणियरित्या वाढणार आहे. तर ही करवाढही पुढील आर्थिक वर्षापासून असणार आहे.
टंचाईत पाणीपट्टीचा ‘भडका’
By admin | Published: December 19, 2015 3:07 AM