तळेगाव दाभाडे : वाढते तापमान हे चिंताजनक आहे. पर्यावरण आणि निसर्ग संपदा जपली पाहिजे. जगात शंभरपेक्षा अधिक देश पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वत्र राबविला गेला पाहिजे. वनसंपदा जपली पाहिजे, तरच पर्यावरण टिकेल. पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारमध्ये पाण्याचा ताळेबंद विद्यार्थी करतात. शासकीय निधी आणि योजनेचा पुरेपूर वापर, ग्रामस्थांची साथ आणि लोकसहभागामुळेच हिवरे बाजार गाव जगाच्या पटलावर गेले आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदर्श ग्राम कार्यक्रम निदेशक व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत ‘वन, मृद, पाणी : युवकांचे योगदान’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना पवार बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, खजिनदार चंद्रकांत शेटे, संचालक शैलेश शाह, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, संयोजन समिती अध्यक्ष विलास काळोखे, चंद्रभान खळदे, संदीप काकडे, संजय साने, निरुपा कानिटकर, उद्योजक राजेश म्हस्के, नंदकुमार शेलार, राजश्री म्हस्के, मनोज ढमाले, दत्तात्रय पडवळ, सुदाम कदम, सचिन टकले यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या राष्ट्रीय खेळाडूंना पोपटराव पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.पोपटराव पवार पुढे म्हणाले, आज जगभर पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खाली गेली आहे. आपल्या संतांनी, राष्ट्रपुरुषांनी अवलंबलेली जलनीती राबविणे आवश्यक आहे. आज ज्या भागात जास्त पाऊस पडतो, त्याच भागात पाणीटंचाई दिसते आहे. योग्य नियोजन करून पाण्याचे पुनर्भरण करता येते, ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रस्तावित संदीप काकडे यांनी केले. सूत्रसंचालन दीप्ती कन्हेरीकर आणि आर. आर. डोके यांनी केले. चंद्रभान खळदे यांनी आभार मानले............पोपटराव पवार पुढे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला आहे. त्यामुळे पाणी पुनर्भरणासोबतच मातीसंवर्धन करणेही निकडीचे आहे.
शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये पाण्यासाठी संघर्ष : पोपटराव पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:25 PM
वाढते तापमान चिंताजनक
ठळक मुद्देतळेगावमधील व्याख्यानमालेत मार्गदर्शन रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला