शेटफळगढे : पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ४४ गावे आणि २९७ वाड्यावस्त्यांवर ५६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक बारामती तालुक्यात २१ टँकर आहेत. मार्च महिन्याच्या सुरवातीला हे चित्र आहे. उन्हाळ्यात तीव्र दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.बारामती तालुक्यापाठोपाठ इंदापूर तालुक्यात १५, पुरंदर १२ आणि दौंड तालुक्यात ८ असे जिल्ह्यातील चार तालुक्यांतील गावात टँकर सुरू आहेत. टँकरबरोबर याच चार तालुक्यांतील खासगी ११ विहिरी आणि ५ बोअर अधिग्रहण केले आहेत. पाण्याची गरज भागविण्यासाठी ५६ टँकरने २०० खेपा केल्या जातात. ५६ टँकरमध्ये शासकीय २१, तर खासगी ३५ टँकरचा समावेश आहे. केवळ बारामती तालुका वगळता अन्य तालुक्यात शंभर टक्के खेपा होत नाही, असेही चित्र आहे. बारामती तालुक्यात प्रस्तावित ७४ खेपा आहेत. त्या सर्व केल्या जात असल्याची आकडेवारी आहे. तर इंदापूर तालुक्यातील ६४ प्रस्तावित खेपांपैकी ५९, दौंड तालुक्यात ३२ खेपांपैकी ३०, तर पुरंदर तालुक्यातील ४२ पैकी २७ खेपा केल्या जात आहेत. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १ लाख २५ हजार ६३३ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या, गावे, टँकरची संख्या बारामती तालुक्यातील आहे. त्यापाठोपाठ इंदापूर तालुक्याचा नंबर लागला आहे. याबरोबरच या चार तालुक्यांतील गावांची टँकर मागणी आहे. त्यामुळे हा आकडा वाढत असल्याचे प्रशासनाने सांगितले .
चार तालुक्यांमध्ये ५६ टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: March 07, 2016 1:54 AM