चासकमान : चास मिरजेवाडी (ता. खेड) येथील वनक्षेत्रात कडूस येथील डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी खेड वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांसाठी चारा, पाणी व धान्यांची सोय केली आहे.
वाढत्या उन्हामुळे दुष्काळ निर्माण होत आहे. याचा परिणाम मनुष्याबरोबरच पशुपक्ष्यांवरही होत आहे. यामुळे त्यांचा नाश होऊ नये व त्यांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:हून पुढाकार घेत आपल्या घरून एक एक मूठ धान्य जमा करत असा अभिनव उपक्रम राबवला. मोर, चिमणी, कोकिळा, पोपट, मैना, बगळा, गिधाडे, कावळा, बहिरी ससणा, घार, माकड आदींसह विविध प्रकारचे पक्षी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. मात्र, दिवसेंदिवस निसर्गाची होत चाललेली हानी यामुळे पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हितासाठी पुढाकार घेतला आहे. या वेळी वनपाल रामदास गोकुळे, नितीन विधाटे, सीमा सपकाळ, वनरक्षक प्रदीप शिंदे, संगीता वडजे, अमृता नाईकवाडे, वनसेवक नवनाथ चव्हाण, राजाराम सातकर, अध्यक्ष प्रतापराव गारगोटे, प्राचार्य शिवाजी गुंजाळ, अभिजित गुंजाळ, राजेंद्र खळदकर, श्रीपती मुळूक, सुरेश व्यवहारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.खेड तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला परिसर४खेड तालुक्यातील मिरजेवाडी, रानमळा, आंबेगाव तालुक्यातील भावडी, कुदळेवाडीच्या वनविभागाच्या परिसरात साग, काटेसायरी, गुलमोहर, बदाम, नारळ आदींसह विविध प्रकारची झाडे असल्याने हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या झाडांमध्ये विविध पक्ष्यांचा असणारा किलबिलाट त्यांना अन्नधान्य, पाण्याची असणारी गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या शिक्षकांच्या मदतीने वन्य जिवांना, पक्ष्यांना दाणापाण्याची सोय व्हावी या दृष्टिकोनातून पाणी, दाणे ठेवण्याचे काम सुरू केले असून, वनविभागाला नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांनी केले.