पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने ३१ जुलैपर्यंत कोणत्याही स्वरूपाची पाणीकपात करण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. मॉन्सून लांबल्याने व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने सध्या प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत राव यांनी सांगितले की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला एका महिन्यासाठी १.०१ टीएमसी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचे होणारे बाष्पीभवन व ग्रामपंचायती व इतर संस्थांना करण्यात येणारा पाणीपुरवठा विचारात घेता खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे किमान ३१ जुलैपर्यंत तरी पाणीकपात करण्याची गरज नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले. याबाबत राव यांनी सांगितले की, सध्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान १८ जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होईल. पुण्यात २० जूनपर्यंत पाऊस आला, तरी जूनअखेर पर्यंत धरणांमध्ये पाण्याचा येवा सुरू होईल. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा
By admin | Published: June 15, 2016 5:27 AM