पुणे : पाणीटंचाईने पूर्वीपासूनच त्रासलेल्या पुणेकरांना विविध कामांच्या खोदकामांमुळे नादुरुस्त होणाऱ्या जलवाहिन्यांमुळे वारंवार उद्भवणारा पाणीपुरवठा बंदचा त्रास सहन करावा लागत आहे. अशाच एका मेट्रोच्या कामात खोदाई करताना जलवाहिनी फुटल्याने, ती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने गुरुवार, १२ मे राेजी पुणे स्टेशन परिसरातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.११) जलमंदिर ते ससून लाईन येथील पाण्याची लाईन मेट्रोच्या खोदकामामुळे नादुरुस्त झाली आहे. सदरच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, गुरुवारी रात्रीपर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. परिणामी गुरुवारी दिवसभर खालील भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असून, शुक्रवार, १३ मे रोजी कमी दाबाने व उशिरा या भागाला पाणीपुरवठा होणार आहे.
पाणीपुरवठा बंद असलेला भाग
पुणे स्टेशन, ससून परिसर, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क, घोरपडी, डीफेन्स, कॅम्प परिसर, सोमवार पेठ, जुना बाजार परिसर, मंगळवार पेठ, पाटील इस्टेट, वाकडेवाडी परिसर, शिवाजीनगर, जुनी पोलीस लाईन परिसर, पुणे विद्यापीठ परिसर.