दौंड : शहरातील नागरीकांची ‘अनियमीत व कमी दाबाने पाणी’ यातून सुटका होणार आहे. यासाठी नगरपरिषदेने सुमारे ३० कोटींची सुधारीत पाणीपुरवठा योजना तयार केली असून तिला विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरीही मिळाली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास शहरातील बहुतांशी भागात पाणीपुरवठा करता येईल, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी दिली.दौंड शहराची अस्तित्वातील पाणीपुरवठा योजना ही ३५ ते ४0 वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे ती पूर्णपणे बदलणे गरजेचे आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नगर परिषदेवर मोर्चे, आंदोलनेही झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा निर्ण्य घेतला आहे.सध्या कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये बऱ्याचठिकाणी पीव्हीसी पाइपचा वापर आहे. त्यामुळे गळतीही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे नगर परिषदेने नुकतेच जल व ऊर्जा लेखापरीक्षण शासनाच्या सुजल व निर्मल योजनेंतर्गत करून घेतले. त्यानुसार भविष्यातील ३० वर्षांची पाण्याची गरज विचारात घेऊन, महाराष्ट्र नगरोत्थान योजनेंतर्गत सुधारित पाणीपुरवठा योजनेची रक्कम २९,४२,४६००० च्या कामाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. नगरपरिषदेने विशेष सभेत ठराव घेवून मंजूरही घेतली आहे.ही योजना पूर्ण झाल्यास शहरातील भीमनगर, इंदिरानगर, साठेनगर, सिद्धार्थनगर, तुकाईनगर, नवगिरेवस्ती यासह शहरातील इतर भागाला पुरेसा पाणीपुरवठा करता येईल. या बैठकीला नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे, मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दौंड शहराचा पाणीपुरवठा होणार सुरळीत
By admin | Published: February 19, 2016 1:28 AM