पुणे : नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करताना जुन्या पाण्याच्या पाईपलाईनवरच जेसीबीने खोदकाम करण्याचा प्रयत्न केल्याने सेनापती बापट रोडवर पाईपलाईन फुटण्याची घटना सोमवारी दुपारी ४च्या सुमारास घडली़ यामुळे चतु:शृंगी पाण्याच्या टाकीचा पाणीपुरवठा बंद करावा लागला़ त्यामुळे औंध, भोसलेनगर, खडकी, बोपोडी या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला़ औंध, पाषाण परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी एसएनडीटी पाणीपुरवठा केंद्रातून चतु:शृंगी येथील पाण्याच्या टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे़ चतु:शृंगी मंदिराजवळ जेसीबीने खोदकाम सुरू असताना अचानक खाली पाण्याची जुनी लाईन लागली़ जेसीबीच्या टोकदार दाताने खोदण्याचा प्रयत्न करताच पाईप लाईनला तो घाव बसून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फवारा आकाशात झेपावला़ हा फवारा आकाशात काही मीटर उंच उडत होता़ या पाण्याने शेजारच्या बंगल्यावर जणू पाऊस कोसळत असल्याचा भास होत होता़ चालकाने जेसीबीचे तोंड त्यावर ठेवून पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला़ जवळपास अर्धा तास ही गळती सुरू होती़ त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले़ याबाबत चतु:शृंगी पाणीपुरवठा केंद्राचे अधिकारी वीरेंद्र केळकर यांनी सांगितले, की आता पाणीपुरवठा बंद केला असून टाकीत जेवढे पाणी जमा झाले आहे ते सोडले जाईल़ यामुळे औंध, भोसलेनगर, खडकी, बोपोडी या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे़ रात्री उशिरा दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला़ गेल्या आठवड्यातही गणपती मंदिर चौकात याच पाईपलाईनसाठी खोदकाम करताना महावितरणच्या केबल तुटल्या होत्या़ (प्रतिनिधी)
पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत
By admin | Published: April 25, 2017 4:18 AM