पुणे :पाटबंधारे विभागातर्फे पुणे महापालिका ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्यावर बुधवारी (10 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता पालिकेस दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी(11 ऑक्टोबर) शहरातील पूर्व भागाला कोणतीही कल्पना न देता पाणी मिळालेले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यात मुंबई येथे झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेला दररोज 1150 एमएलडी पाणी उचलण्यास मंजुरी देण्यात आली.
त्यानंतर एका आठवड्यात शहराच्या पाणी वापराचे नियोजन करण्यात येईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. मात्र संबंधित काळात नियोजन न झाल्याने महापालिका मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी उचलत होती.ही बाब लक्षात आल्यावर पाटबंधारे विभागाने तात्काळ जाऊन तीन पैकी दोन पंप बंद करण्यात आले. त्यामुळे पर्वती जलशुद्धीकरण केंद्र वगळता इतर कुठेही पाणी मिळाले नाही.याचाच परिणाम म्हणून ऐन नवरात्रीत वडगाव शेरी, चंदननगर, खराडी आणि हडपसरच्या काही भागाला आज पाणीपुरवठा झालेला नाही.पाणी येणार नसल्याची कुठलीच कल्पना महापालिकेने दिली नसल्याने सकाळपासून नागरिक वैतागलेले आहेत.