भोसरी : जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही, तर मोठे संकट ओढवेल. शालेय परीक्षा सुरू असल्याने पाणीकपात थांबवण्यात आली होती. मात्र, आता पाणी कपातीशिवाय पर्याय नाही. नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा. १५ एप्रिलपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिघी येथे केले. शहरातील रस्ते, रेल्वे पूल, शाळा, भाजी मंडई अशा विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. दिघीतील कार्यक्रमात ते बोलत होते.पवार म्हणाले, ‘‘ मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अन्य भागांतून मोठ्या संख्येने नागरिक शहरांकडे येत आहेत. त्याचा ताण शहरावर येऊ लागला आहे. त्यातच पवना धरणात ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात भामा-आसखेड व आंद्रा धरणातून पाणी आणायला हवे. या वर्षी भामा किंवा आंद्रा यातील एका धरणातून पाणी आणण्यात येईल. (वार्ताहर) लांडेना पाहिले की लांडगे गरम होतातभोसरीतील कार्यक्रमांमध्ये माजी आमदार विलास लांडे उपस्थित नव्हते. दरम्यान, प्रास्ताविक भाषणात आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांचे आभार मानले. त्याचा उल्लेख आपल्या भाषणात करत पवार म्हणाले, लांडे यांनी यापूर्वीच भोसरी मतदारसंघात आपले स्वागत केले आहे. आता महेश लांडगे यांनी आभार मानले. सध्या खूप गरम होत असल्याने ७ तारखेला होत असलेला मंडईच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारऐवजी संध्याकाळी घेतला आहे. मात्र, येथे लांडेंना पाहिले की लांडगे गरम होतात, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. ....अन् अजित पवारांचा ताफा थांबलाएक कार्यक्रम आटोपून पुढील कार्यक्रमासाठी ताफा जात असतानाच चिंचवड, दळवीनगर येथील पुलावर पवार यांचा ताफा अचानक थांबला. एका अपघातात जखमी झालेल्या मुलीची विचारपूस करीत उपचाराबाबत योग्य त्या सूचना दिल्यानंतर ताफा मार्गस्थ झाला. ‘कोलकाता’ होणार नाही, याची काळजी घ्याभूमिपूजन केलेल्या विविध विकास प्रकल्पांचा खर्च निविदा रकमेपेक्षा कमी असल्याबाबत बोलताना पवार म्हणाले, करदात्यांच्या पैशांची अधिकाधिक बचत व्हावी, असा प्रयत्न असला, तरी कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नाही. विकासकामे करताना ‘कोलकाता’ होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
१५ एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा
By admin | Published: April 03, 2016 3:52 AM