इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या सुजल निर्मल अभियानांतर्गत सन २०११ पासून कासवगतीने सुरू असणारे इंदापूर नगर परिषदेच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या पूर्वीच्या कामांप्रमाणे गटारातून टाकण्याचे काम यथासांग चालू आहे. ही जलवाहिनी पाटील बंगला, सोनाईनगरजवळच्या इंदापूर नगरपालिकेच्या वॉटर सप्लाय बेडचे वॉशचे हजारो लिटर पाणी सांडपाण्याच्या नाल्यामधून जाते. हे सांडपाणी पूर्णत: दूषित आहे. या पाण्यातूनच नवीन योजनेची जलवाहिनी जात आहे. सांडपाण्याचा नाला पूर्वीपासूनच आहे. त्यामधून पाणीपुरवठ्याची जलवाहिनी असल्याचे ठेकेदाराला माहीत असूनदेखील त्याने भूमिगत जलवाहिनी वा गटार करण्याचा निर्णय घेतला नाही. ही जलवाहिनी टेलिफोन कार्यालयाच्या संरक्षक भिंतीच्या बाजूला नेण्याऐवजी तहसीलदार निवासाच्या बाजूने नेली असती, तरी आत्ता दिसते ती गलिच्छ परिस्थिती दिसली नसती. उजनी किंवा बारामतीच्या जलवाहिनीसारखी सिमेंट काँक्रिटीकरण करून पाण्याच्या वरून नेली असती तरी अडचण नव्हती.श्री खंडोबा माळ येथील उंच साठवण टाकीमध्ये पाणी टाकण्याकरिता ही पाईपलाईन जाणार आहे. ती पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, शासकीय विश्रामगृह, इंदापूर महाविद्यालय व माळवाडी गावाच्या दर्शनी भागातील रस्त्यालगत आहे. जर दूषित पाण्यामधून जलवाहिनी गेली आहे, तर पाठीमागची जॅकवेल, इंटक विहीर, जलवाहिनीचे काम कसे झाले आहे. जॅकवेल व इंटक विहिरी कामाच्या अंदाजपत्रकानुसार खोल केल्या आहेत की ‘लावलिजाव, टमकी बजाव’ पद्धतीने काम केले आहे, याची शंका लोकांना येत आहे.विष्णू घुले नावाच्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे. हा इसम कधीही कामाकडे येत नाही, अशी माहिती मिळाली. (वार्ताहर)
इंदापूरला पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी गटारातून
By admin | Published: October 13, 2016 2:26 AM