पुणे: येरवडा व त्यापुढील परिसराला पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थित पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेने राबवलेली भामा आसखेड धरणातून पाणी घेण्याची योजना पुढील वर्षीही पूर्ण होण्याची शक्यता कमीच दिसते आहे. काम रखडल्यामुळे योजनेच्या खर्चात १४ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने स्थायी समितीची त्यासाठी मंजुरी मागितली आहे. योजनेत काही जणांच्या जमिनी बाधीत होत आहेत. धरणाच्या कामात विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारीही महापालिका व योजनेचे लाभार्थी असलेल्या अन्य घटकांवर टाकण्यात आली आहे. पुनर्वसन होत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांकडून काम सुरू करण्याला विरोध होत आहे. महापालिकेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने आतापर्यंत काही कोटी रूपये या योजनेसाठी खर्च केला असून आता कामच होत नसल्यामुळे खर्चात सातत्याने वाढ होत आहे. सोडूनही देता येत नाही व पूर्णही करता येत नाही अशी महापालिकेची या योजनेबाबत अवस्था झाली आहे. प्रशासनाने काम सुरू केले की लगेचच प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू होते व काम थांबवावे लागते. त्यातच काही राजकारण्यांनी यात उडी घेतली असल्याने प्रश्न अधिक जटील झाला आहे. महापालिका आयुक्त म्हणून सुत्र हाती घेतलेले सौरव राव याआधी पुण्यातच जिल्हाधिकारी म्हणून सलग ४ वर्षे कार्यरत होते. त्यांना या योजनेची व त्यात येणाऱ्या अडचणींची माहिती आहे. जिल्हाधिकारी असताना त्यांनी त्यात मध्यस्थी करून काम सुरूही करून दिले होते. त्यामुळेच आता महापालिका आयुक्त म्हणून ते यात लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. पाईलाईनचे काम बऱ्यापैकी झाले असले तरी जॅकवेलचे काम मात्र अपुर्णच आहे. ते रखडले असल्याने त्याच्या खर्चात वाढ होत आहे.एकूण १४.३८ कोटींनी या प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. जुलै २०१९ मध्ये तरी हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात असते. योजनेचे काम पुर्ण झाले तर पुणे शहरातील नगर रोड, वडगावशेरी, पिंपरी - चिंचवड शहरातील पाण्याची समस्या निकाली निघणार आहे. त्याशिवाय आळंदी व अन्य काही नगरपालिकांनाही यामुळे पाणी देणे शक्य होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.
भामा आसखेडमधून पाणी पुरवठा योजनेला अपूर्णतेचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 8:34 PM
महापालिकेच्या योजनेमुळे पुणे शहरातील नगर रोड, वडगावशेरी, पिंपरी - चिंचवड शहरातील पाण्याची समस्या निकाली निघणार आहे.
ठळक मुद्देकामाची मुदत आणि खर्चात वाढ : पूर्वभागाला पाण्याची प्रतिक्षाच जुलै २०१९ मध्ये तरी हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही याविषयी शंका महापालिकेचे आतापर्यंत काही कोटी रूपये या योजनेसाठी खर्च