बारामती : उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडण्यात आले होते; त्यामुळे जलशयातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. पाणीपातळी खालावल्याने बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे उद्योगांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होेते. उजनीतून बारामती एमआयडीसीला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठी गळती होते. परिणामी, एमआयडीसीतील उद्योगांना आवश्यक पाणीपुरवठा होत नाही. पाणी संकटाची टांगती तलवार उद्योगांवर कायम असते. टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ या उद्योगांवर अनेक दिवसांपासून आली आहे. त्यातच मंगळवार (दि. १९)पासून एमआयडीसीचा पाणीपुरवठा पूर्ण थांबला आहे. शुक्रवारी (दि. २२) हा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा एमआयडीसी प्रशासनाच्या करण्यात येणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे आगामी दोन दिवस उद्योगांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांच्यासह पंढरीनाथ कांबळे, शहाजी रणनवरे, शंकर कचरे, संजय थोरात, सुनील गोळे, नरेश तुपे, भाऊसाहेब तुपे, टी. पी. नायर, रमाकांत पाडुळे, बापू बाबरे या उद्योजकांनी उजनी जलाशयाला भेट देऊन पाहणी केली. याबाबत अध्यक्ष काकडे यांनी सांगितले की, उजनीतून पाणी सोडल्याने पाणीपातळी घटली, एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. (प्रतिनिधी)
पाणीपुरवठा थांबला; उद्योगांसमोरील प्रश्न गंभीर
By admin | Published: April 20, 2016 12:51 AM