ग्रामपंचायतीची भोसेवस्ती येथून राबवली गेलेली पाणीपुरवठा योजना चार दिवसापासून विजेअभावी बंद असल्याने ऐन उन्हाळ्यात सर्व ग्रामस्थ पिण्यासह इतर वापराचे पाणीही विकत घेत आहेत.पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.त्यामुळे वीजपुरवठा त्वरित सुरळीत करून पाणीपुरवठा योजना पूर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचे वीजबिल थकल्याने महावितरण विभागाने पाणी पुरवठा योजनेचे विद्युत कनेक्शन चार दिवसांपूर्वी बंद केले.यामुळे तळेगाव ढमढेरे गावाची पाणीपुरवठा योजना बंद आहे.तळेगाव ढमढेरे गावातील घरपट्टी ५ कोटी ७६ लाख ७० हजार ८०७ इतकी थकबाकीआहे.पाणीपट्टी ३० लाख ९२ हजार १७८ रुपये इतकी थकबाकी आहे.तर जागेचे भाडे १६ लाख ८८ हजार ९८४ रुपये इतके थकीत असून सध्या ग्रामपंचायतीचे थकबाकी वसूल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी सांगितले.
महावितरण विभागाची १९ लाख १५ हजार ७८० इतकी थकबाकी असल्याने महावितरणने ग्रामपंचायतीचा भोसेवस्ती येथे असणारा सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद केला असल्याचे तळेगाव ढमढेरे येथील महावितरण विभागाचे उपअभियंता अमोल खंडागळे यांनी सांगितले.
पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेचे विजबिल थकबाकी आहे.त्यामुळे महावितरणने वीज कनेक्शन कट केले. १ लाख रुपये विजेची थकबाकी भरून उरलेले बिल टप्प्या टप्प्याने दिले जातील. असे लेखी पत्र स्थानिक ग्रामपंचायतीने महावितरण विभागाला दिले आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व थकबाकी भरण्याचा आग्रह धरला असल्याचे सांगितले.तसेच ग्रामस्थांनी देखील आपली थकलेली घरपट्टी,पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
संजय खेडकर,ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत,तळेगाव ढमढेरे)
तळेगाव ढमढेरे येथील नळ पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाक्या.