बारामती : बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू करण्यास पाणीप्रश्न सोडविण्यास एमआयडीसी प्रशासन अद्यापही अयशस्वी ठरले आहे. गेल्या सहा दिवसांपासून या परिसरातील पाणीपुरवठा ठप्प आहे. अखेर शनिवारी (दि. २३) अखेर नगरपालिका प्रशासनाची मदत घेण्यात आली. येथील ‘रेसिडेन्शियल झोन’मध्ये अग्निशमन वाहनामधून पाणीपुरवठा करण्यात आला.पाणीपुरवठ्याअभावी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेकांची नोकरी संभाळून पाण्यासाठी भटकंती करताना दमछाक होत आहे. अखेर पाणीपुरवठा न सुरू झाल्याने बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी पाण्याच्या समस्येबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी त्याची तातडीने दखल घेत याबाबत नगराध्यक्ष योगेश जगताप यांना सूचना दिल्या. त्यानंतर येथील नागरिकांना अग्निशामक वाहनातूनच पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.काकडे यांनी सांगितले, की वेळेत पाणीपुरवठा करण्याचे एमआयडीचे प्रशासनाचे आश्वासन प्रत्यक्षात अपूर्णच आहे. आज सहावा दिवस आहे. या भागात अक्षरश: एक थेंबदेखील पाणीपुरवठा झालेला नाही. उद्योजकांनी मुख्य अभियंता पाटील यांच्याकडे येथील नियोजनाच्या अभावाची तक्रार केली आहे. पोलीस प्रशासनाशी पाणीचोरीबाबत तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांना समज दिली आहे. आगामी काळात पाणी जलवाहिनी फोडण्याचे प्रकार झाल्यास पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार आहे. बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की उद्योजकांच्या तक्रारीनंतर पाणीचोरी बंद होण्याची आशा आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीतून बारामतीच्या पाणीपुरवठा केंद्रात पाणी पोहोचले आहे. रात्रीपर्यंत पुरेसा साठा झाल्यानंतर उद्या सकाळी पाणीपुरवठा सुरळीत होईल. (प्रतिनिधी)प्रशासनाचा दावा खोटाउजनीतून पाच ते सहा टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी सोडल्यानंतर पाणीपातळी कमालीची घटली. परिणामी, बारामती एमआयडीसीचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. तर, ढिसाळ नियोजनामुळे दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचा एमआयडीसी प्रशासनाचा दावादेखील खोटा ठरला आहे.
अग्निशामक वाहनातून पाणीपुरवठा
By admin | Published: April 24, 2016 4:22 AM