पुणे : पंपींग स्टेशन्सच्या अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा हाेण्याती शक्यता आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
गुरुवारी पर्वती पंपींग, राॅ वाॅटर पंपींग तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी पंपींग, वारजे जलकेंद्र, नवीन हाेळकर पंपींग स्टेशनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. अद्याप मान्सूनने हजेरी न लावल्यामुळे पुण्याच्या धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. शहरातील उपनगरांमधील काही भागांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर अनेक भागात पाणीपुरवठा अनियमित असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नुकताच चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यात पाणी कपात करण्यात आली हाेती. त्यावेळी पालिकेला पुणेकरांच्या राेषाला सामाेरे जावे लागले हाेते. पाेलीस वसाहतीत पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने तेथील महिलांनी हंडा माेर्चा काढला हाेता. गुरवारी पाणी बंद असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पर्वती, चतुःश्रुंगी, लष्कर तसेच नवीन हाेळकर पंपींग भाग या सर्व पंपींग स्टेशन्समधून हाेणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.