कुरकुंभ : कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्याचा उद्रेक होत असताना ग्रामस्थांच्या जनआक्रोशाच्या रेट्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळ धास्तावले असताना अधिका-यांनी सर्व कारखान्यांमधील पाण्याचे नमुने तपासून दोषी कंपनीविरोधात पाणी व वीज बंद करण्याचे लेखी आदेश कुरकुंभ औद्योगिक विकास मंडळाच्या क्षेत्रामधील अधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार या ठिकाणी या दोषी कंपनीचे पाणी बंद करण्यात आले; मात्र वीज वितरण कंपनीला देखील आदेश असताना ते त्यांना मिळाले नसल्याचा बनाव अधिकारी करीत असून वीज तोडण्यास विलंब करीत असल्याचे प्राथमिक निदर्शनात समोर येत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी दोषी कंपनीच्या बाजूने का? असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयातून कुरकुंभ येथील दोषी कंपनीविरोधात (दि.१५) ला लेखी आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार हे पत्र औद्योगिक विकास मंडळाच्या कुरकुंभ येथील कार्यालयाला (दि.१८) प्राप्त झाले व त्यानुसार त्यांनी तत्काळ दोषी कारखान्यांना नोटीस देत पाणी बंद केले. मात्र, त्याच कालावधीत महावितरण कंपनीलादेखील नोटीस दिलेली असताना ते मिळाले नसल्याचा खोटा बनाव सर्वच अधिकारी करताना दिसत आहेत. याबाबत त्यांना विचारले असता आम्हाला कसलेही पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी दौंड, बारामती, केडगाव, कुरकुंभ येथील महावितरणाच्या जबाबदार अधिकाºयांना संपर्क केला असता काहींनी नकारात्मक उत्तर दिले तर काहींनी काहीच प्रतिसादच दिला नाही.>सामान्य ग्राहकांना वेगळा न्यायएकीकडे महावितरणचे अधिकारी सामान्य ग्राहकांनी एक जरी बिल थकवले तर थेट वीज तोडण्याची अगदी तत्परतेने कारवाई करतात. मात्र, दुसरीकडे प्रदूषण मंडळाकडून दोषी कंपनीची वीज तोडण्यासाठी लेखी आदेश देऊन आठवडा उलटला तरीदेखील कारवाई शून्य. त्यामुळे यापुढे ग्रामस्थांवर कारवाई केल्यास ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. कारण, मुजोर कंपनी मालकांना एक न्याय व सामान्य ग्राहकांना दुसरा न्याय, असे ग्रामस्थ खडसावून सांगत आहेत.कुरकुंभ महावितरण कार्यालयात बुधवारी (दि.२७)ला दुपारी तीनच्या सुमारास केडगाव कार्यालयातून मेल मिळाल्यानंतर दोषी कंपनीची वीज त्वरित खंडित केली आहे; त्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केली असे नाही.- प्रीतम साळवेकर, सहायक अभियंता, महावितरण कुरकुंभ>महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे हे कुरकुंभ येथे पाहणी करण्यासाठी आले असताना याबाबत त्यांना थेट प्रश्न विचारले असता, त्यांनीदेखील महावितरणला लेखी आदेश पाठवले असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून देखील सूचना दिली असल्याची माहिती महावितरण अधिकाºयांना दिली. मात्र, तरीदेखील अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाºयांनी देखील त्यांना वीज तोडण्यासाठी लेखी कळवले आहे.महावितरणाच्या या भोंगळ कारभाराने काही दोषी कंपन्या पाणी बंद होऊनदेखील खासगीत पाणी विकत घेऊन आपली कंपनी बिनधास्तपणे सुरू ठेवत आहेत. त्यामुळे कारवाई होऊनदेखील कारखानदार मुजोरपणा दाखवत आपण कोणालाच भीत नाही, याचे स्पष्ट आवाहन शासन व्यवस्थेला देत आहेत. प्रदूषणाच्या विषयाला कारखानदार किती सहजपणे घेत आहेत, याचे उदाहरण कुरकुंभ येथे पाहण्यास मिळते. त्यामुळे या अत्यंत मुजोर कारखानदारावर आता पोलीस कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.दरम्यान सर्वच बाजूने महावितरण कंपनीविरोधात जनआक्रोश तयार होत असताना याची दखल बुधवार (दि.२७) ला सायंकाळी महावितरण कंपनीच्या अधिकाºयांनी दोषी कंपनीच्या विरोधात कारवाई करत वीजजोड खंडित केली आहे. ग्रामस्थांनीही या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र, ही कारवाई किती काळ व कशी असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.>प्रदूषण मंडळाच्या लेखी आदेशानुसार दोषी कंपनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे. तसेच येणाºया काळातदेखील इतर कंपन्यांच्या विरोधातील कारवाई जलद गतीने करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रामधील कुठलाही अनुचित प्रकार जो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असेल, त्याला खपवून घेतले जाणार नाही .जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार प्रदूषण मंडळाच्या अधिकारी यांना कार्यालयीन कामकाज करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.- विजय पेटकर,उपअभियंता, कुरकुंभ औद्योगिक विकास महामंडळ
‘त्या’ कंपन्यांचे पाणी बंद, वीज सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:41 AM