नारायणगाव : पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठ्यात असलेल्या ४.४ टीएमसी पाण्यापैकी २.३ टीएमसी पाणी सोलापूर, नगर व पुणे या जिल्ह्यांसाठी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याने पाणीप्रश्न पुन्हा पेटणार, अशी चिन्हे आहेत. कुकडी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागवून दि़ १५ किंवा १६ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे़ पाणी सोडण्याच्या प्रश्नावर मोठा संघर्ष होणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई येथे मंत्रालयात कुकडी, घोड आणि दारणा या धरणांतून पाणी सोडण्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक नुकतीच झाली़ या बैठकीला नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार दिलीप गांधी, आमदार दिलीप वळसे-पाटील, राहुल जगताप, विजय औटी, बाबूराव पाचर्णे, नारायण पाटील, स्रेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते़ या वेळी विविध मान्यवरांनी पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. कुकडी पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे़ त्यामुळे ज्या धरणात ४ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे, त्या धरणातून पिण्याबरोबरच फळबागा वाचविण्यासाठी कुकडीतून आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी झाली़ महाजन म्हणाले, की पिंपळगाव जोगा धरणात ४.४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ या धरणातून २.३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ पिंपळगाव जोगा धरणातून येडगाव धरणात आणि त्या धरणातून कुकडी डावा व मीना शाखा कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ आहे़ (वार्ताहर)करमाळ्यापर्यंत पाणी पिंपळगाव जोगा धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यापर्यंत सोडण्यात येणार आहे़ बंदोबस्तात हे पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्ऱ १चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिली.
पिंपळगाव जोगातून तीन जिल्ह्यांना पाणी
By admin | Published: April 14, 2016 2:07 AM