पुणे : धरणसाठ्यात उपलब्ध असलेले पाणी वर्षभर पुरविण्याच्या नियोजनानुसार शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यानुसार शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, त्याची अंमलबजावणी आजपासून (सोमवार) होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कुणी पाण्याचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास भरारी पथकांमार्फत दंडात्मक कारवाई बरोबरच नळ कनेक्शन तोडले जाणार आहेत. वेळा सांभाळण्यासाठी कसरतशहरामध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना काही ठिकाणी रात्री पाणी सोडले जाणार आहे, काही ठिकाणी भल्या पहाटेच पाणी भरण्यासाठी उठावे लागणार आहे. तर काही ठिकाणी दुपारच्या वेळी पाणी येणार आहे. घरातील नवरा-बायको दोघेही कामाला जात असल्यास पाण्याचा प्रश्न येणार आहे.
पाणीगळतीची दुरूस्ती व्हावी खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्राला जोडणाऱ्या वाहिनीतून अनेक ठिकाणी गळती होते. त्याचबरोबर शहरातून अनेक ठिकाणी पाणी गळती होत असल्याचे फोन हेल्पलाइनवर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पाण्याचा गैरवापर केल्यास प्रशासनाने ही गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. कमी पाणी आल्यास टँकरने पाणीपुरवठाज्या भागाला कमी पाणी येईल तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कमी पाणी मिळणाऱ्या भागाला प्राधान्याने टँकर पुरविण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे. पाणी न आल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये कुठेही पाण्याचा गैरवापर होत असल्याचे तसेच गळती होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी २५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.