कडूस : शिरोली (ता. खेड) येथे स्वत:च्या अडीच एकर शेतातील उभी पिके नष्ट करून शेतातील विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे दातृत्व दाखविण्याचे काम शिरोली येथील गोविंद मनाजी राक्षे व संजय रामचंद्र राक्षे करीत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून शिरोली गावास अव्याहतपणे स्वत:च्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी देण्याचे काम करीत आहेत.सध्या सर्वत्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. खेड तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरूनगर शहरापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर भीमा नदीकाठावर असलेल्या शिरोली गावात सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. भीमा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे झाले आहे. त्याचा परिणाम परिसरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शिरोलीत दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे.शिरोली गावातील बेंढालेवस्ती, वडारवस्ती, भेसळवाडी, वैदवस्ती या वाड्यावस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे गावच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. परंतु, भीमा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे या वाड्या-वस्त्यांना दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन शिरोली येथील शेतकरी गोविंद मनाजी राक्षे व संजय रामचंद्र राक्षे यांनी आपल्या अडीच एकर शेतजमिनीत असलेली दुधी भोपळा, बाजरी व मका ही पिके स्वत: उपटून नष्ट केली असून, जमीन नांगरून टाकली आहे व शेतासाठी देण्याचे विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी मोटारने उपलब्ध करून दिले आहे. बेंढालेवस्ती, वडारवस्ती, भेसळवाडी व वैदवस्ती या वाड्या-वस्त्यांवरील जवळपास एक हजार लोकवस्तीला या विहिरीवरून दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे.शिरोली येथील वडारवस्ती, भेसळवाडी व वैदवस्ती या बहुतांश मागासवर्गींय नागरिकांच्या वस्त्या आहे. येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन शेतकरी गोविंद राक्षे व संजय राक्षे यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून जवळपास दीड ते दोन कि.मी. अंतरावरून स्वखर्चाने पाइपलाइन करून घराजवळ पाण्याची टाकी बांधून मोटारीने विहिरीतील पाणी या पाण्याच्या टाकीत टाकून नळकोंडाळी काढली आहेत. या नळकोंडाळ्यावर गेल्या तीस वर्षांपासून बाराही महिने या वस्त्यांवरील नागरिक पिण्यासाठी पाणी नेत आहेत.गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी देण्यासाठी स्वत:च्या शेतातील पिके नष्ट करून मानवता धर्म पाळत नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या गोविंद राक्षे व संजय राक्षे या शेतकऱ्यांचे संपूर्ण शिरोली गावात कौतुक होत आहे. (वार्ताहर)देवाच्या कृपेने उन्हाळ्यातही आमच्या शेतातील विहिरीस मोठ्या प्रमाणावर पाणी असते. शेतातील पिकांसाठी पाणी देण्याऐवजी लोकांना पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. म्हणून शेतातील पीक नष्ट करून प्रथम लोकांसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे.- गोविंद राक्षे, शेतकरीशेतातील पिकांना पाणी देण्यापेक्षा मानवता धर्म महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिकांपेक्षा नागरिकांना पाणी देणे महत्त्वाचे आहे. गेल्या तीस वर्षांपासून येथील नागरिकांना या विहिरीचे पाणी देत असून, त्यामुळे नागरिकांच्या आशीर्वादामुळे व देवाच्या कृपेने विहिरीस भरपूर पाणी उपलब्ध आहे.- संजय राक्षे, शेतकरी
स्वत:ची पिके नष्ट करून गावाला पाणी!
By admin | Published: May 29, 2016 3:58 AM