भोसरी : सरासरी पाऊस पडला असला, तरी उन्हाचा भीषण तडाखा पाहता यंदा एकीकडे पाण्यासाठी घशाला पडलेली कोरड, तर दुसरीकडे विनाकारण वाया जाणारे पाणी, असे चित्र दिसत आहे. वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यवसाय, उद्योग व्यवसाय व हॉटेलमध्ये ग्राहकांकडून वाया जाणाऱ्या पाण्यापर्यंत दररोज हजारो लिटर पाणी शहरात वाया जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.भोसरी व परिसरात काही भागांमध्ये दोन दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे. काही नागरिकांकडून विजेच्या मोटारीद्वारे पाणी घेण्याचाही प्रकार घडत आहे. नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. टॅँकरमध्येही पाणीगळती विविध सोसायट्या, हॉटेल, तसेच कारखान्यांमध्ये वापरासाठी मागवले जाणारे पाणी टँकरच्या माध्यमातून येते. पण टँकरच्या व्हॉल्व्ह गळतीतून कित्येक लिटर पाणी दररोज वाया जात आहे. प्रत्येक टॅँकरमध्ये पूर्ण पाणी भरल्यानंतर चालकाचे दुर्लक्ष झाल्यास हजारो लिटर पाणी अक्षरश: वाया जाते. तसेच, टॅँकर व्यवस्थित न लागल्यासही पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे चित्र दिसून येते. वस्त्यांमध्ये पाण्याचा अपव्यय लांडेवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती भागात लहान मुलांना पाणी भरण्यासाठी बसविण्याच्या प्रकारामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची नळ चोरीला गेल्याने येथील पाण्याच्या टाक्यांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. मात्र, हे नळ दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात नाही. या वस्त्यांप्रमाणेच मुबलक पाणी असलेल्या वस्त्यांमध्ये पाण्याचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. (वार्ताहर)उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने पिण्याचे पाण्याच्या शोधार्थ पादचाऱ्यांची नजर भिरभिरत असते. भोसरीत अनेक सामाजिक संघटना व मित्र मंडळांनी ठिकठिकाणी पाणपोयीची व्यवस्था केली असून, त्याचा वापर पिण्यासाठी व्हावा असा उद्देश आहे; पण अनेकदा नागरिक पाणपोईचा हात, पाय, तोंड धुण्यासाठी वापर करत असून पाण्याचा अपव्यय होत आहे. वाहने, बंगले, हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकाने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा उपयोग केला जात असल्याचे चित्र दररोज दिसून येते. ग्राहक संपल्यानंतर कामगारांकडून रात्री उशिरा छोटी-मोठी हॉटेल, रेस्टॉरंट्स व मॉल्स पिण्याच्या पाण्याचा उपयोग करून सर्रासपणे धुतले जात आहेत. याबरोबरच वाहने, बंगले व घरे धुण्यासाठीही पाण्याचा वापर केला जातो.सध्या लग्नसराई सुरू असून, परिसरातील मंगल कार्यालयांत कार्यक्रमासाठी पाण्याचे डबे मागवले जात आहेत; पण पाहुणे मंडळींकडून, लहान मुलांकडून हळद खेळण्याबरोबरच पाणी खेळण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांत पाण्याचा अपव्यय सर्रासपणे पाहायला मिळतो. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, पाणी टाकून देण्याचा प्रकार दररोजच घडत आहे. सार्वजनिक नळकोंडाळी, सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृहांबरोबरच विविध शासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहांमधील नळ नादुरुस्त असणे किंवा नळ चोरीला जाण्यामुळे त्या ठिकाणी रात्रंदिवस पाणीगळती होते. मात्र, त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून एका मिनिटाला एक लिटर अशा वेगाने पाणी वाया जाते. पाणी वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना नाही.भोसरीत वॉशिंग सेंटरवर सर्रासपणे पाण्याचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. टेल्को रस्त्यालगतच्या गळक्या व्हॉल्व्हमधून पाणीगळती सुरू आहे. त्यातच वाहनचालक गाड्या धुण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत. शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी टँकरमधूनही पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहर परिसरात होतोय पाण्याचा अपव्यय
By admin | Published: April 19, 2017 4:19 AM