कोरेगाव भीमा : राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणावर दुष्काळ, तर दुसरीकडे पाण्याचा भरमसाठ साठा, अशी विरोधाभासी परिस्थिती सर्रास पाहण्यास मिळत असतानाच भीमा नदीकाठच्या शिरूर-हवेली तालुक्यात मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पूर्वी भीमा नदीकाठच्या गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. नदीमध्ये खड्डे खोदून झरे तयार करून या झऱ्यांमधून हंड्यात पाणी भरून घरी आणावे लागत असे. १९९४ साली चासकमान धरणाची निर्मिती झाल्यानंतर भीमा नदीमध्ये बारमाही पाणी राहू लागले. परंतु, पाणी नदीत साठू लागल्याने पाण्याचा अपव्ययही त्या प्रमाणात वाढू लागला. शेतीला उसाचे सर्रास पीक घेत पाणी रात्रंदिवस सोडून देण्याची प्रवृत्ती वाढू लागल्याने परिसरातील शेतीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढून अनेक ठिकाणची शेतीही आज नापीक बनू लागली आहे.जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना शिरूर-हवेली तालुक्यात मात्र दुष्काळ काय असतो, हेच भीमा नदीकाठच्या गावांना माहीत नसल्यासारखी परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींमार्फत पुरवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या नळांना तोटीच नसल्याने पाणी भरून गेल्यानंतर नळाचे पाणी तसेच मोकळे सोडले जाते. तर या नळांच्या पाण्याचा वापर प्रेशरने गाड्या धुण्यास, बांधकामांना पाणी मारण्यासाठी सर्रास केला जातो. (वार्ताहर)शुद्ध प्रकल्पातील पाणी गटारात..शुद्ध पाणी प्रकल्पातून ताशी ३ हजार लिटर शुद्ध पाणी तयार होते. तर २ हजार लिटर पाणी वेस्टेज होते. हे पाणी अक्षरश: गटारांमध्ये सोडून दिले जाते. म्हणजे एका गावात जर शुद्ध पाणी प्रकल्प सात ते आठ तास चालत असेल, तर सुमारे १६ हजार लिटर वेस्टेज पाणी गटारात सोडले जात असून, शिरूर-हवेली-दौंड तालुक्यांत सुमारे १२० पेक्षा जास्त प्रकल्प उभे आहेत. या प्रकल्पातून दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र, तरीही कोणतीच ग्रामपंचायत या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा साधा विचारही करू शकत नाही, ही शोकांतिका आहे.
भीमा नदीकाठी पाण्याचा अपव्यय
By admin | Published: April 13, 2016 3:24 AM