पुणे : दांडेकर पूलाजवळ कालवा फुटल्याची घटना घडल्यामुळे सुमारे पंधरा दिवसांहून अधिक कालावधीपासून इंदापूरला सोडण्यात आलेले पाणी बंद होते. मात्र, सोमवारी पुन्हा इंदापूरलापाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे इंदापूरसह इतर भागातील शेतकऱ्यांच्या पिकांसाठी व नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
सुमारे दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच खडकवासला धरणातून इंदापूरसाठी सोडण्यात आलेले पाणी कालवा फुटल्यामुळे बंद करण्यात आले.मात्र,जलसंपदा विभागाकडून १५ ते २३ आॅक्टोबर या कालावधीत इंदापूरला खडकवासला धरणातून आवर्तन सोडले जाणार आहे.
पावसाने दडी मारल्याने खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत चालला आहे.गेल्या वर्षी खडकवासला धरण प्रकल्पात १४ आॅक्टोबर २0१७ रोजी २७.४४ टीएमसी पाणीसाठा होता. मात्र, यंदा १४ आॅक्टोबर २0१८ रोजी धरण प्रकल्पात २५.४४ एवढा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.