पुणे : महापालिका हद्दीतील आंबेगाव पठार परिसरातील जलवाहिनीतून महापालिका हद्दीबाहेरील नागरिकांनी एकाच जलवाहिनीतून शेकडो नळजोड अनधिकृतरीत्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ६ इंचांच्या जलवाहिनीवर अवघ्या २ ते ३ जागांतच हे नळजोड घेण्यात आले आहेत.आंबेगाव पठार येथे स.नं १६मध्ये महापालिकेच्या हद्दीत असलेल्या रस्त्याच्या बाजूला गल्ली क्रमांक १ ते ६ आहेत. या गल्ल्यांसाठी महापालिकेकडून प्रत्येकी ६ इंच व्यासाच्या जलवाहिन्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र, या जलवाहिन्या जेथून जातात त्या ठिकाणाहून रस्त्याच्या पलीकडे म्हणजेच महापालिकेच्या हद्दीबाहेर असलेल्या शेकडो जणांनी या जलवाहिन्यांना अनधिकृत टॅब (नळजोड) मारले आहेत. शेकडे जलवाहिन्यांचे पाईपचे जाळेच तयार झाले आहे. याबाबत या परिसरातील काही नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारही केलेली असून, पालिकेकडून त्यावर कारवाई करण्याची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.हे नळजोड घेणारे नागरिक प्रामुख्याने महापालिका हद्दीबाहेर आंबेगावच्या हद्दीत येतात. या भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. महापालिकेकडून राज्य शासनाच्या नियमानुसार या गावाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नळजोड घेणे आवश्यक आहे. मात्र, या नागरिकांनी पालिकेच्याच जलावाहिनीवर नळजोड घेतल्याने महापालिकेला नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांनाच पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे या नळजोडांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)>हद्दीजवळ सर्वाधिक समस्या महापालिकेकडून हद्दीजवळील ५ किलोमीटरच्या परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. अशी जवळपास ३४ गावे आहेत. या गावांचे शहराच्या उपनगरांपेक्षाही अधिक वेगाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे या परिसरातील पाण्याची मागणी वाढलेली असून महापालिकेच्या जलवाहिनीतून अनधिकृत नळजोड घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.
पालिकेच्या जलवाहिनीची चाळण
By admin | Published: April 26, 2016 1:03 AM