जुन्नर तालुक्याचे पूर्व भागात खरीप पिकांचे क्षेत्र अधिक आहे. पूर्वमोसमी वळवाचे व मोसमी पावसाचे ओलीवर पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, पिंपळवंडी, वडगाव कांदळी, बोरी, आळेफाटा, आळे, संतवाडी कोळवाडी, राजुरी, उंचखडक, गुंजाळवाडी, बेल्हा, गुळुंचवाडी व पठार भागावरील आणे नळावणे, शिंदेवाडी पेमदरा या भागात शेतकरी वर्गाने बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मका, मूग, तूर, वटाणा व कडधान्ये या पिकांच्या पेरण्या दोन टप्प्यांत जून महिन्याचे मध्यंतरी व शेवटी केल्या. मोसमी पावसाचे आगमन या भागात वेळेवर झाले मात्र या पावसाने गती न पकडल्याचा परिणाम पेरण्या झालेल्या या पिकांवर अगदी सुरुवातीच्या अवस्थेत झाला. जुलै महिन्याचे दुसऱ्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले व त्यावेळी झालेल्या दमदार भीज पावसाचा आधार या पिकांना मिळाला. अगदी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी असलेल्या पूर्व भागातही गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. याचा परिणाम वाढीच्या अवस्थेतील खरीप पिकांवर होऊ लागला आहे. पाण्याअभावी ही पिके सुकण्याचे अवस्थेत आहेत.
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके सुकू लागली असल्याचे सुनील कुटे (पिंपरी पेंढार), मिथून दांगट (पिंपळवंडी) व संतोष पाडेकर (संतवाडी) यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत या भागात पाऊस न झाल्यास ही खरीप पिके अडचणीत येणार आहेत. शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.