लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यांतर्गत प्रवासी सेवेसह आंतरराज्य सेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. पुणे विभागाच्या पणजी व पंढरपूर मार्गे गाणगापूरला जाणारी एसटी अद्याप बंद आहे. तर इंदोर व सुरत, बडोद्याला जाणाऱ्या गाड्या सुरू आहेत. तसेच कर्नाटकातील बिदर, गाणगापूर, गुलबर्गा आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटी आता पूर्वपदावर आली आहे. ऑगस्ट महिन्यात मध्य प्रदेश व गुजरात राज्यात एसटी धावू लागली. मात्र, गोवा राज्य सरकारने अद्याप एसटीला परवानगी दिली नसल्याने पुणे - पणजी सेवा अजून सुरू झाली नाही. तसेच पंढरपूरमार्गे बेळगाव व गाणगापूरची सेवा देखील बंद आहे. मात्र बिदर, गाणगापूर व विजापूरची सेवा सुरू असून अन्य राज्यांच्या तुलनेत कर्नाटकातील शहरांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.
बॉक्स 1
परराज्यांत जाणाऱ्या गाड्या
पुणे- बिदर
पुणे- सुरत
पुणे- बडोदा
पुणे-इंदोर
पुणे- गाणगापूर
पुणे- गुलबर्गा
पुणे- विजापूर
बॉक्स 2
बिदर, गाणगापूरला सर्वाधिक प्रतिसाद :
पुण्याहून आंतरराज्य सेवेत धावणाऱ्या बहुतांश गाड्यांना चांगला प्रतिसाद आहे. मात्र सर्वाधिक प्रतिसाद बिदर, गाणगापूर ह्या गाडीला आहे. यानंतर विजापूरला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे.
बॉक्स 3
८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण :
राज्य परिवहन महामंडळाचे जवळपास ८० टक्के वाहक -चालकांचे लसीकरण झाले आहे. यातील दोन्ही डोस घेतलेल्याची संख्या देखील अधिक आहे. २० टक्के वाहक - चालकांचे लसीकरण झाले नाही. मात्र त्यांचे लसीकरण झाले नाही म्हणून त्यांच्या कामात कोणताही अडथळा आलेला नाही.
कोट :
पणजी व पंढरपूर मार्गे बिदर, गुलबर्गा जाणाऱ्या गाड्या अजूनही बंदच आहे. गोवा सरकारने अद्याप महाराष्ट्राच्या एसटीला प्रवेशावर बंदी आहे. मात्र, अन्य राज्यातल्या सेवा सुरळीत सुरू आहे.
ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग.