पुणे : सरकार, त्यांची धोरणे यावर टिका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही घाबरविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही. याविरोधात संविधान मानणाऱ्या सर्वांनी एकत्र आले पाहिजे. संसदीय राजकारणातून या सरकारचा पराभव करा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व भारतीय संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आयोजित "धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी" राज्यस्तरीय संकल्प परिषदेला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यावेळी बोलत होते. यासाठी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सचिव मिलिंद देशमुख, माधव बागवे उपस्थित होते.
स्वामी अग्निवेश यांच्यावर यापूर्वी झालेले हल्ले लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वामी अग्निवेश म्हणाले, सत्तेत बसलेली शक्ती 'वसुधैव कुटुंबकम' च्या विरोधात काम करीत आहे. त्यांच्या विरोधात घंटी वाजली आहे. सर्व मनुष्य हा एकाच परिवाराचा भाग आहे.
जो धर्म माणसाला माणसाचा दर्जा देऊ शकत नाही, त्याला धर्म म्हणता येणार नाही. कुणाच्या अंगावर कोट्यवधी रूपयांचा कोट दिसतो तर गरिबांच्या अंगावर घालण्यासाठी सूत नाही. हा कोट कुणाच्या अंगावर होता, ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही असे अग्निवेश यांनी स्पष्ट केले. अंधश्रद्धेची गुलामी सर्वात घातक आहे, त्यामुळे त्यविरोधातील लढाई सर्वात महत्त्वाची असल्याचे अग्निवेश यांनी सांगितले.