पुणे: ‘दीड शतकाहून अधिक काळ रुग्णसेवेचा वारसा असलेल्या ससून रुग्णालयात काम करतोय, हे पूर्वी अभिमानाने सांगायचाे. याबाबत समाजात मान असायचा; पण आता ‘ससून’मध्ये काम करीत आहोत हे सांगायचीही लाज वाटते. कारण ‘ससूनमध्ये ड्रग्ज कसे सापडले?, हाॅस्पिटलमध्ये ड्रग्ज कसे काय मिळते?, ललित पाटीलचे पुढे काय झाले? अशा प्रश्नांची सरबत्तीच सुरू हाेते. समोरच्या प्रश्नार्थक नजरांचा सामना करणे नकोसे वाटते, अशी भावना ससून रुग्णालयात काम करणारे डाॅक्टर, कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
महिनाभरापूर्वी ससून रुग्णालयात कैदी वाॅर्डात उपचार घेणारा कैदी ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवीत असल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. जेथे रुग्ण व्याधिमुक्त व्हायला जातात, व्यसन साेडायला जातात. त्या ससून रुग्णालयात अमली पदार्थाचे रॅकेट चालतेय हे सर्वांसाठीच धक्कादायक हाेते. या रुग्णालयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्याचा ताेटा मात्र येथे काम करीत असलेल्या डाॅक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना तर हाेत आहेच त्याचबराेबर येथे वैद्यकीय अभ्यासाचे धडे गिरवणारे भावी डाॅक्टर, येथून शिक्षण घेऊन बाहेर प्रॅक्टिस करणारे डाॅक्टर यांनाही याबाबत विचारणा हाेत आहे. असे प्रश्न आल्यावर काय उत्तर द्यावे, हा प्रश्नही त्यांना पडत आहे.
ससून रुग्णालयात सेवा बजावणारे एक डाॅक्टर म्हणाले की, काेराेना काळात ससूनमध्ये काम करताे असे म्हटल्यानंतर आम्हाला खूप मान असायचा; परंतु सध्या नातेवाइकांकडून आणि बाहेरील मित्रांकडून ‘ससून’मधील ड्रग रॅकेट प्रकरणाची आमच्याकडे चाैकशी केली जाते. ‘ससून’मध्ये खरेच ड्रग्ज मिळते का, रुग्णालयात हे रॅकेट कसे चालते, त्या प्रकरणी पुढे काय झाले? अशी विचारणा हाेत असल्यामुळे आम्ही नातेवाइकांना फाेन करणे देखील साेडून दिले आहे, असेही ते खेदाने म्हणाले.
बैरामजी जीजीभॉय उर्फ बी. जे. मेडिकल कॉलेज हे पुण्यातील सर्वांत जुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. सन १८७८ मध्ये बी. जे. वैद्यकीय शाळा नावाने ते सुरू झाले व १९४६ मध्ये त्याला महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. ससून रुग्णालयाशी हे संलग्न असलेले हे वैद्यकीय विद्यालय आहे. याच महाविद्यालयाने जसे जगविख्यात नामवंत डाॅक्टर समाजाला दिले. तसेच डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे, डॉ. जब्बार पटेल हे वैद्यकीय पेशातील नामवंत अभिनेतेही या संस्थेने दिले. तसेच आतापर्यंत हजाराे वैद्यकीय विद्यार्थी या संस्थेने घडवले आहेत. परंतु, आता येथील ड्रग्ज प्रकरणामुळे संस्थेची समाजात हाेत असलेली बदनामी पाहून हे सर्वजण व्यथित हाेत आहेत.
मी इतक्यात एका अंत्ययात्रेला गेलाे हाेताे. तेथे काही ओळखीचे लाेक भेटले. मी ससूनमध्ये काम करत असल्याचे माहीत असल्याने त्यांनी मला चरस, एमडी ड्रग्ज मिळतील का? असे उपहासाने विचारले. या प्रसंगात मी स्वत:च खजील झालाे व ससूनसारखी माेठी संस्था बदनाम हाेते, हे पाहून खूप वाईट वाटते.’ -एक कर्मचारी, ससून रुग्णालय
मी राहताे त्या साेसायटीमध्ये शेजारी-पाजारी यांच्याकडून आता आम्हाला ससूनच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत विचारणा हाेते. त्यामुळे फार लाजिरवाणे वाटते. काही जणांच्या चुकीमुळे पूर्ण संस्था बदनाम हाेते, हे फार दु:खद आहे. -एक डाॅक्टर, ससून रुग्णालय
मी स्वतः ससूनचा विद्यार्थी राहिलो आहे; पण आज जे काही ससूनबद्दल वाचायला मिळत आहे. ते भयावह असून, त्याबद्दल वाईट वाटते. कारण, ससून ने केवळ रुग्णांवर उपचार केले नाही तर आमच्यासारख्या अनेक डाॅक्टरांच्या पिढ्याही घडविल्या आहेत. -ससूनचा माजी विद्यार्थी, नांदेड