पुणे : गेल्या पाच वर्षात आघाडी सरकारने केलेला कचरा साफ करण्याचं काम आम्ही करत आहाेत अशी टीका पुण्याच्या महापाैर आणि भाजपाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी केली. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत त्या बाेलत हाेत्या.
कसब्याचे आमदार गिरीश बापट हे खासदार झाल्याने भाजपाकडून कसब्यातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. टिळक यांनी पत्रकार परिषद घेत आपला जाहीरनामा सादर केला. यावेळी बाेलताना त्यांनी आघाडीवर टीका केली. गेल्या पाच वर्षात आघाडी सरकारने केलेला कचरा साफ करण्याचं काम आम्हाला करावं लागत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
आपल्या जाहीरनाम्याबाबत बाेलताना त्या म्हणाल्या, महापाैर म्हणून मी अनेक विकासकामे केली. निवडूण आल्यास कसब्यातील जुन्या वाड्यांचा पुर्नविकास करण्याचे काम हाती घेणार आहे. तसेच कसबा मतदारसंघामध्ये अनेक बाजारपेठा असल्याने महिलांसाठी दर एक किलाेमीटर वर स्वच्छतागृह तयार करणार आहाेत.भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करुन त्यांनी ग्रीन टॅगिंग करणार असल्याचेही टिळक यावेळी म्हणाल्या.
माेदींची सभा गुरुवारी पुण्यातीस स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर हाेत आहे. त्यासाठी अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्याविषयी पत्रकारांनी मुक्ता टिळक यांना प्रश्न केला असता झाडे नाहीतर सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून फांद्या ताेडल्या असल्याचं त्या म्हणाल्या. तसेच संस्थेने झाडे ताेडण्याबाबत रितसर परवानगी घेतली आहे. असंही त्या यावेळी म्हणाल्या.