बारामती : आतापर्यंत आम्ही विरोधाचे राजकारण केले. मात्र आता सत्तेचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा चंग बांधला आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. बारामती येथील भिगवण चौकामध्ये बुधवारी (दि. १६) वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश गोफणे यांच्या प्रचारानिमित्त अॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, की सध्याचे मुख्यमंत्री त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नदीजोड प्रकल्प करण्याचे आश्वासन देतात. देशामध्ये नदी प्रकल्पाची कोणतीही योजना नाही. अशा प्रकल्पांना विरोध झालेला आहे. मुख्यमंत्र्यांना त्याची जाणीव नाही. धरणांमधील पाणी अनेक कारणांसाठी वापरले जाते. त्या पाण्याने पुनर्नियोजन केल्यास दुष्काळी भागांना पाणी मिळू शकते. मात्र पाण्याच्या पुनर्नियोजनासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप-शिवसेनेच्या सरकारने कोणतेही प्रयत्न मागील काळात केले नाहीत. धोरणात्मक निर्णय घेण्याची ताकद लागते. ती ताकद यांच्यामध्ये नाही. बँका, सहकार चळवळ मोडीत निघाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीदेखील सध्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा सल्ला घेण्यासाठी जा, असे सांगतात. राष्ट्रीयीकृत बँकादेखील दिवाळखोरीत निघतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. —————————————-
आम्ही सत्तेमध्ये जाण्याचा चंग बांधला आहे : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 7:01 PM
आतापर्यंत आम्ही विरोधाचे राजकारण केले. मात्र आता सत्तेचे राजकारण सुरू केले आहे...
ठळक मुद्देबारामती येथे प्रचारसभा