पिंपरी : आम्ही या भागातील दादा असून, आम्हाला हप्ता न देणा-यांना खल्लास करून टाकू, असे म्हणून टोळक्याने नासधूस करून वडापावच्या गाडीवरील गल्ल्यातील एक हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कोयते व लाकडी दांडके हवेत फिरवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी १४ आरोपींवर गुन्हा दाखल करून पाच जणंना अटक करण्यात आली. दत्तनगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. १९) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
अजय कांबळे, प्रदीप गोणे, सजनी सावंत, दत्ता देवकर, अजय थोरात, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह राहुल कांबळे, अभिजित गायकवाड, दादा शिंदे, काक्या शिंदे, सोन्या कांबळे, दशरथ पात्रे, मुकूल कांबळे, निहाल शेख, मोसिन शेख (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रंजना निवृत्ती शिंदे (वय ५५, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पतीसह दत्तनगर येथे त्यांच्या वडापावच्या गाडीवर थांबले होते. त्यावेळी आरोपी लाकडी दांडके व कोयत्यांसह तेथे आले. आम्ही या भागाचे दादा आहोत, तुम्ही आम्हाला द्यायचा व आता आम्हा सर्वांना वडापाव द्यायचा, असे आरोपी म्हणाले. तुम्ही खूप दिवसांपासून वडापावची गाडी लावून फुकटचे पैसे कमावताय, आम्हाला वडापाव व रोज एक हजार रुपये हप्ता द्यायचा, जर हप्ता दिला नाही तर तुम्ही येथे वडापावची गाडी लावायची नाही, असे आरोपी म्हणाले. आमचे हातावरचे पोट आहृ आम्ही दिवसभर राबतो व तुम्ही फुकट वडापाव खाऊन आमच्याकडे पैसे मागता काय, असे फिर्यादी व त्यांचे पती आरोपींना म्हणाले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या पतीला धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करून वडापावच्या गाडीवरील वडापाव घेतले. त्यानंतर वडापाव विक्रीचे झालेल्या धंद्याचे गल्ल्यामधील सुमारे एक हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
दहशतीमुळे दुकाने केली बंदआम्ही या भागातील दादा असून, जर आमचे कोणी ऐकले नाही व आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही एकएकाला खल्लास करून टाकू, असे म्हणून आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा केला. वडापावच्या गाडीजवळील खुर्च्या तोडून वडापावसाठी लागणारे तेल व इतर साहीत्य फेकून देऊन नासधूस केली. त्यांनी केलेल्या दहशतीमुळे आजूबाजूला असलेल्या दुकानदारांनी दुकाने बंद करून घेतली. रस्त्यावरील लोक इकडेतिकडे सैरावैरा पळू लागले. त्यामुळे फिर्यादीच्या मदतीला कोणीही आले नाही. तसेच आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून कोयते व लाकडी दांडके हवेत फिरवीत दहशत पसरवीत निघून गेले.