पुणे : कोरोनाच्या साथीमध्येही जिवाची पर्वा न करता अहोरात्र काम केलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना आता दुप्पट तणावाखाली काम करावे लागत आहे. एकीकडे कोरोना साथीला अटकाव करण्याची जबाबदारी, तर दुसरीकडे स्वच्छ सर्वेक्षणची ड्युटी. तब्बल १८-१८ तास काम करावे लागत असल्याने ''आम्ही माणसं आहोत... कुठे कुठे जुंपताय?'' असा उद्विग्न सवाल या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
शहरात कोरोना रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे कोरोना चाचणी केंद्र, कोविड सेंटर, रुग्णांचे ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोन तसेच विनामास्क कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे. आरोग्य निरीक्षक आणि सहायक आरोग्य निरीक्षकांना त्याकरिता नेमण्यात आले आहे. या कामासाठी जवळपास दहा ते बारा तास द्यावे लागतात. त्यातच आता स्वच्छ भारत अभियान २०२०-२१ च्या परीक्षणाचे अतिरिक्त काम कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे दिवसातील तब्बल 18 तासांची ड्युटी या कर्मचाऱ्यांना करावी लागत असल्याने सर्व कर्मचारी वैतागले आहेत. ही कामे करून पुन्हा दैनंदिन स्वच्छतेची कामे पार पाडावी लागतच आहेत.
शहरात दाखल झालेल्या स्वच्छ भारत अभियान स्पर्धेच्या परीक्षण पथकाकडून सकाळी ८ ते रात्री १२ पर्यंत शहरात कोणत्याही भागात भेट देऊन पालिकेच्या स्वच्छतेची पाहणी केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील घसरलेली प्रतवारी पुन्हा सावरून पंचतारांकित दर्जा मिळविण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. त्याकरिता या स्पर्धेचे ३०० हून अधिक निकष पूर्ण करावे लागणार आहेत. हे जोखड पुन्हा आरोग्य निरीक्षकासह घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आले आहे. या धबगडग्यात कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसही घेण्यात आलेली नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.